शंभर वाहन चालकांचे प्रबोधन ; इंटरसेप्टर व्हॅनची चालकांना सखोल माहिती
महाराष्ट्र न्यूज इंदापूर प्रतिनिधी : शहाजीराजे भोसले
इंदापूर येथील महामार्गावर अथवा इतर ठिकाणच्या रस्त्यांवर वाहन चालवताना चालकांनी आपल्या वाहनांच्या वेगवेगावर नियंत्रण ठेवावे , आपल्या घरी आपले कुटुंब वाट पहात आहेत . त्यांचा विचार करून वाहतुकीचे नियम लक्षात घेवूनच वाहन चालवावे असे इंदापूर महामार्ग वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर मुठेकर यांनी सांगितले .
सोनाई दुध सहकारी वाहतूक संस्थेच्या १०० वाहन चालकांना वाहन सुरक्षा अभियानाअंतर्गत सोनाई परिवार , महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ व शहर ग्रामीण मराठी पत्रकार संघाच्या वतीने वाहन सुरक्षा अभियान व प्रबोधन यावर मार्गदर्शन सोमवार ( दि. ५ ऑक्टोबर ) रोजी इंदापूर तालुक्यातील गोखळी येथील सोनाई डेअरी च्या प्रशासन सभागृहात प्रबोधनाचे आयोजन करण्यात आले होते . यावेळी शंकर मुठेकर बोलत होते .
यावेळी सोनाईचे मुख्य कार्यकारी संचालक विष्णुकुमार माने , तज्ञ संचालक अतुल माने , महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे इंदापूर तालुका अध्यक्ष नीलकंठ मोहिते , पत्रकार संघाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मधुकर गलांडे , नानासाहेब चांदणे , सचिव सागर शिंदे , पुणे जिल्हा संपर्कप्रमुख महेश स्वामी , जिल्हा प्रसिद्धी प्रमुख सोमनाथ ढोले , उपाध्यक्ष संदीप सुतार , इंदापूर तालुका संघटक भिमराव आरडे , गोकुळ टांकसाळे , रामदास पवार , उदयसिंह देशमुख , शिवकुमार गुणवरे, प्रेस फोटोग्राफर अक्षय आरडे , राजेंद्र भोसले यांच्यासह मान्यवर उपस्थित होते .
पुढे बोलताना शंकर मुठेकर म्हणाले की , वाहन चालक अनेक वेळा उजव्या बाजूने आपली वाहने चालवतात , त्यावेळी वाहतूक नियमांचे उल्लंघण केले जाते. त्यामुळे वाहतूक शाखेच्या अधिकारी व कर्मचारी यांना ऑनलाईन दंड टाकावा लागतो . त्यामुळे आपल्या वाहन मालकांना तो दंड सोसावा लागतो . त्याच वेळी आपण वाहतुकीचे नियम पाळून आपण वाहन चालविल्यास आपला दंड वाचू शकतो .
यावेळी मुठेकर यांनी चालकांना वाहतूक नियमांची संपूर्ण माहिती दिल्यानंतर , चालकांना इंटरसेप्टर वाहनाची सखोल माहिती दिली . त्यानंतर रस्त्यावर जावून ज्या वाहनांना मागे पुढे रिफ्लेक्टर नाही त्यांना लाल , पिवळे व पांढरे रिफ्लेक्टर पट्ट्या लावण्यात आल्या .
यावेळी सोनाई वाहतूक संस्थेचे व्यवस्थापक दीपक सातव , संजय मचाले , वाहतुक शाखेचे पोलीस हवालदार मच्छिंद्र माने , पोलीस नाईक संतोष काळे , नाथा गळवे आदी उपस्थित होते .






















