मावळत्या एस.पी. तेजस्वी सातपुते यांना निरोप
सातारा : नूतन जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल यांनी आज शुक्रवार, दि. 9 रोजी आपल्या पदाचा पदभार स्वीकारला तर मावळत्या एस.पी. तेजस्वी सातपुते यांना निरोप देण्यात आला. पोलीस परेड ग्राऊंडवर झालेल्या सोहळ्यात सातपुते यांच्यावर कौतुकाचा वर्षावही झाला.
कोल्हापूर परिक्षेत्रीय पोलीस संचालक मनोजकुमार लोहिया यांच्या प्रमुख उपस्थितीत पोलीस परेड ग्राऊंड येथे जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या निरोप समारंभाचे आयोजन केले होते. यावेळी जिल्हा पोलीस दलाकडून सातपुते यांना निरोप आणि शुभेच्छा देण्यात आल्या.
या भावपूर्ण सोहळ्यात अनेक पोलीस अधिकार्यांनी आपल्या आठवणींना उजाळा दिला. सातपुते यांच्यासोबत केलेल्या कामाच्या आठवणी जागवल्या. सातपुते यांच्या नेतृत्वाखाली पोलीस दल एक कुटुंब झाले होते अशीच भावना या कार्यक्रमात अनुभवयास मिळाली. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांच्या हस्ते जिल्हा पोलीस दलातर्फे गणेशाची मूर्ती भेट म्हणून देवून सातपुते यांचा सत्कार करण्यात आला. याच कार्यक्रमात नूतन पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल हे दाखल झाले.
आयजी मनोजकुमार लोहिया यांच्या हस्ते त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी नवीन रुजू झालेल्या सातारा, कोरेगाव, वाई विभागाच्या नूतन उपअधीक्षक यांचेही स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमानंतर नूतन एस.पी. अजय कुमार बन्सल यांनी पोलीस मुख्यालयातील जिल्हा पोलीसप्रमुख कार्यालयात जाऊन आपल्या पदाचा चार्ज घेतला. मावळत्या एस.पी. तेजस्वी सातपुते यांनी त्यांना चार्ज दिल्यानंतर त्या सोलापूरकडे रवाना झाल्या.