पूर्वी वृत्तपत्र सायकलवरुन घरोघरी वाटली जात होती. आता मोटारसायकल वापरली जात असल्याने पेट्रोलचा खर्च वाढला असला तरी कमीशनमध्ये वाढ झाली नाही. कमी किंमतीत अंक विकणे आता वितरकांनाही परवडत नसल्याने कमिशन वाढले नाही तरी चालेल मात्र अंकाची किंमत वाढली तरच व्यवसाय परवडेल.तसेच किंमत वाढली तरी खपावर फारसा परिणाम होणार नाही, असा विश्वास व्यक्त करुन महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांच्या वर्तमानपत्र किंमत वाढीच्या भूमिकेला औरंगाबाद शहरातील वृत्तपत्र व्रिकेत्यांनी पाठींबा दिला.
औरंगाबाद येथील महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या विभागीय कार्यालयात बुधवार दि. 7 ऑक्टोंबर रोजी प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांच्या उपस्थितीत वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे मराठवाडा उपाध्यक्ष अन्नासाहेब जगताप, औरंगाबाद वृत्तपञ विक्रेता संघटनेचे अध्यक्ष निलेश फाटके,उपाध्यक्ष काकासाहेब मानकापे, सचिव गणेश भोसले ,कोषाध्यक्ष आसाराम कुलकर्णी, प्रमुख सल्लागार माणिक कदम, सह सचिव शिवाजी ढेपले, प्रसिद्धी प्रमुख भिमराव वायभट यांच्यासह प्रमुख विक्रेत्यांची बैठक झाली. यावेळी विक्रेत्यांनी चाळीस वर्षातील वृत्तपत्र व्यवसायातील अनुभव आणि आर्थिक परिस्थिती सांगुन अलीकडे कमी किंमतीत अंक वितरण करणे परवडत नसल्याचे सांगितले. तर पूर्वी सायकलवरुन वृत्तपत्र वाटली जात होती. आता मोटारसायकल लागते, त्यामुळे पेट्रोलचा खर्च वाढला. मात्र कमिशनमध्ये वाढ होत नसल्याने घरोघरी वृत्तपत्र वाटप करणे परवडत नाही. कोरोना काळात तर सर्वच वृत्तपत्रांचा खप कमी झाला असुन वाटप करण्यासाठी मुलेही मिळत नाहीत. कोरोनामुळे मोठ्या प्रमाणात ग्राहकांकडे बाकी थकली आहे. त्यामुळे आता कमी किंमतीत वृत्तपत्र वाटप करणे हे अडचणीचे झाले आहे.
वृत्तपत्र विक्रेता संघटनेने कमिशनमध्ये वाढ करावी ,यासाठी संप करुनही फारसी वाढ झाली नाही. वृत्तपत्र व्यवस्थापन खप वाढवा म्हणून ग्राहकांना स्वस्तातील वर्तमानपत्र देण्यासाठी वेगवेगळ्या स्कीम राबवते. त्यामुळे लोकांचीही मानसिकता वृत्तपत्र ही स्वस्तातच असतात अशी झाली आहे. मात्र आता विक्रेत्यांचे कमिशन वाढले नाही तरी चालेल पण वृत्तपत्र व्यवस्थापकांनी विक्री किंमत दुप्पटीने वाढवावी. किंमतीत वाढ केल्याने खपावर फारसा परिणाम होणार नाही , असा विश्वास अण्णासाहेब जगताप यांच्यासह उपस्थित विक्रेत्यांनी व्यक्त केला. प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी यावेळी वृत्तपत्र व्रिकेत्यांचे काम अत्यंत मेहनतीचे आहे. पहाटेच्या सुमारास लोक उठण्यापूर्वी वृत्तपत्र घरपोहच देणे हे काम वर्षानुवर्ष करत आहेत.
मात्र मोबदला नाममात्रच मिळतो आहे. वृत्तपत्र विक्रेत्यांप्रमाणेच वर्तमानपत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचीही हीच अवस्था आहे. कोरोना संकटानंतर या व्यवसायाला नव्याने उभारी देण्यासाठी विक्री किंमत वाढवली तर विक्रेत्यांपासून वृत्तपत्रात काम करणाऱ्या सर्वांनाच फायदा होणार आहे. उत्पादन खर्चाच्या तुलनेत विक्री किंमत वाढवण्याच्या चळवळीला वृत्तपत्र विक्रेत्यांनी पाठींबा दिल्यामुळे आता व्यवस्थापन विचार करुन निर्णय घेईल, अशी आशा व्यक्त केली. यासाठी राज्यातील वेगवेगळ्या भागात संपादक आणि पत्रकारांच्या गोलमेज परिषदा होत आहेत. यावेळी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष डॉ.प्रभू गोरे यांनी वृत्तपत्राची किंमत वाढीसाठी पत्रकार संघाने घेतलेली भूमिका स्पष्ट करत या क्षेत्रातील सर्वांच्या फायद्याच्या या विषयाला वृत्तपत्र विक्रेत्यांनी समर्थन दिल्यामुळे अधिक बळ आल्याचे सांगितले. तर महानगर अध्यक्ष अनिल सावंत यांनी वृत्तपत्र व्यवसायातील आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी किंमत वाढ हा पर्याय सर्वांनी स्वीकारावा ,असे आवाहन केले. पत्रकार संघाचे सचिव दिपक म्हस्के, जिल्हा उपाध्यक्ष छबुराव ताके, कोषाध्यक्ष मुकेश मुंदडा, सह सरचिटणीस सदाशिव गवारे, प्रसिद्धी प्रमुख सतिष छापेकर, सह प्रसिद्धी प्रमुख प्रशांत सुर्यतळे आदिंची यावेळी उपस्थिती होती .
वृत्तपत्र विक्रेत्यांचीही गोलमेज परिषद
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांच्या उपस्थितीत राज्याच्या विविध भागात संपादक आणि पत्रकारांच्या गोलमेज परिषदांचे आयोजन केले जात आहे. वृत्तपत्राच्या किंमत वाढीच्या चळवळीला औरंगाबाद, बीड शहरातील वृत्तपत्र विक्रेत्यांनी जाहीर पाठींबा दिला आहे. याच धर्तीवर राज्यातील वृत्तपत्र विक्रेत्या संघटना पदाधिकाऱ्यांची स्वतंत्र गोलमेज परिषद घेण्याचा निर्णय औरंगाबाद शहरातील बैठकीत विक्रेत्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतला आहे.