महाराष्ट्र न्यूज कराड प्रतिनिधी :
सह्याद्री सहकारी साखर कारखाना कार्यक्षेत्रातील इंचन् इंच जमीन बागायत होण्याच्यादृष्टीने स्व.पी.डी.पाटीलसाहेब यांनी प्रयत्न केले. कृष्णा व कोयना नदिच्या तीरावर कारखाना पुरस्कृत लहान-मोठया सहकारी पाणी पुरवठा संस्थांच्या स्थापना केल्या, त्यामाध्यमातून हजारो एकर जमीन बागायत झाली. आणि कृष्णा नदिच्या पूर्व बाजूचे क्षेत्र आरफळ व धोम डाव्या कालव्याद्वारे बागायत झाले आहे. तथापि आरफळ डाव्या कालव्याच्या पूर्वेकडील भाग वंचित राहिल्यामुळे या भागाला वरदान ठरणारया हणबरवाडी-शहापूर व धनगरवाडी-बानूगडेवाडी उपसा जलसिंचन योजनांसाठी आरफळ कालव्यातून पाणी उपसा करणे गरजेचे होते.
या दोन उपसा जलसिंचन योजना कार्यान्वित होण्याच्यादृष्टीने . पी.डी.पाटीलसाहेब यांनी तत्कालीन सरकारकडे प्रयत्न केले. तद्नंतर बाळासाहेब पाटील कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातून प्रतिनिधित्व करत असताना त्यांनी या योजनांना निधी उपलब्ध होण्यासाठी अजितदादा पवार यांच्याकडे पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांना यश मिळून 1014-15 साली उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी निधी उपलब्ध करून दिला व त्यांच्या शुभहस्ते समारंभ पूर्वक सदर योजनांचे भूमिपूजन होवून, दोन्ही योजनांच्या कामाला सुरुवात झाली. परंतू दरम्यानच्या काळात या योजनांना पूरेसा निधी उपलब्ध झाला नसल्याने, या योजनांचे काम रखडले. सध्या महाविकास आघाडी सरकारची स्थापना झाल्यानंतर महाराष्ट्र राज्याचे सहकार व पणन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी या योजनांसाठी पुरेसा निधी उपलब्ध करून दिला असल्याने, या योजनांचे काम युद्धपातळीवर सुरू असून ते अंतिम टप्प्यात आलेले आहे.
सदर हणबरवाडी-शहापूर या योजनेच्या कामाची पाहणी पालकमंत्री नामदार बाळासाहेब पाटील रविवार दिनांक 18 ऑक्टोबर 2020 रोजी 4.00 वाजता मौजे किवळ, खोडजाईवाडी परिसरात प्रत्यक्ष हजर राहून पाहणी करणार आहेत.
तसेच खोडजाईवाडी व किवळ या गावांना वरदान ठरणारा खोडजाईवाडी येथील कासार डोह तलाव पूर्ण क्षमतेने भरला असून, या तलावाचे जलपूजन पालकमंत्री नामदार बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते होणार आहे.
याप्रसंगी सातारा जिल्हा परिषदेचे शिक्षण व अर्थ समिती सभापती मानसिंगराव जगदाळे, कराड पंचायत समितीच्या माजी सभापती .शालन माळी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती माजी सनदी अधिकारी तानाजीराव साळुंखे यांनी दिली.




















