महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी / तारळे :
तारळे येथील टपाल कार्यालयात कामाची अनियमितता सुरू आहे.मोठी उलाढाल असलेल्या या कार्यालयाचे दुखणे कायमचे घालवण्यासाठी वरिष्ठांनी लक्ष देणे गरजेचे आहे, अन्यथा ग्राहक दुरावण्याची शक्यता आहे.
विभागातील १६ डाक शाखांचा व्यवहारही येथून चालतो. मात्र गेल्या काही महिन्यांपासून येथील व्यवहारात अनियमितता सुरू आहे. नवीन खाते काढणे, आरडी खात्यावरील पैसे न मिळणे, असे व्यवहार ठप्प झाले आहेत. त्यामुळे ग्राहक संतापले आहेत. यात ज्येष्ठ नागरिकांची संख्या जास्त आहे. पायऱ्या खाली वर करून लोक वैतागले आहेत, शिवाय टपाल मास्तरांची ग्राहकांना मिळणारी सेवा यथातथाच आहे. याबाबत टपाल मास्तरांनी सांगितले की येथे एक पद रिक्त आहे. दोन माणसावर कारभार सुरू आहे.
यातील कारकुनाला लाँगिन आयडी मिळाला नाही, शिवाय त्यांचे कोरोना मुळे प्रशिक्षण न होता जॉइनिंग झालेले आहे. दिवसातून अनेकदा इंटरनेट गायब होते, परिणामी लोकांची गैरसोय होते आहे. रिक्त पद भरले व असलेल्या कारकुनाला लाँगिन आयडी मिळाला तर तक्रार राहणार नाही. कराड येथील वरिष्ठांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते उपलब्ध होऊ शकले नाहीत. दरम्यान येथील मंजूर तीन पदांपैकी एक पद रिक्त आहे रिक्त पदावरील व्यक्ती दुखापतग्रस्त असल्याच्या कारणावरून डेपोडेशनवर सातारा येथे कार्यरत असल्याचे समजते, नियुक्ती, पगार तारळ्यात अन् काम साताऱ्याला अशी स्थिती आहे. त्वरित माणूस व लाँगिन आयडी मिळणे गरजेचे आहे अन्यथा ग्राहकांच्या संयमाचा बांध फुटू शकतो.