महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी :श्रीकृष्ण सातव
बीए, बीकॉम, बीएस्सी या पारंपरिक अभ्यासक्रमांबरोबर इतर अभ्यासक्रमांसाठी भविष्यात आंतरवासिता (इंटर्नशिप) करावी लागणार आहे. यापुढे इंटरर्नशीप हा अभ्यासक्रमाचाच भाग होणार आहे. याबाबत विद्यापीठ अनुदान आयोगाने नुकत्याच मार्गदर्शक सुचना जाहीर केल्या आहेत. त्यामध्ये इंटर्नशिप हा मुद्दा प्रकर्षाने घेतला आहे.हल्लीचे शिक्षण नोकरी देण्यास सक्षम नाही. पदवी, पदव्युत्तर शिक्षण घेऊन विद्यार्थी बेरोजगार आहेत. बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. उत्तीर्ण होणार्या पदवीधरांच्या तुलनेत रोजगारांच्या संधी कमी आहे. शिवाय विद्यार्थ्यांमध्ये कौशल्याचा अभाव दिसून येत आहे. त्यामुळे केंद्र शासनाने विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासावर भर दिला आहे. त्यासाठी कौशल्य विकास विभाग सुरू करण्यात आलेला आहे.
सध्या केवळ इंजिनीअरिंग, वैद्यकीय शिक्षण, व्यवस्थापन अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांनाच इंटर्नशिप सक्तीची करण्यात आली आहे. मात्र बीए, बीकॉम, बीएस्सी या अभ्यासक्रमांतील विद्यार्थ्यांना सक्ती नाही. त्यामुळे नवीन शैक्षिणिक धोरणात याबाबत स्पष्टता देण्यात आली आहे. यामुळे विद्यापीठ अनुदान आयोगाने मार्गदर्शक सुचना जाहीर केल्या आहेत. यानुसार विद्यापीठांना अभ्यासक्रमात एक पूर्ण सत्र हे इंटर्नशिपसाठी राखीव ठेवण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.
तर याच्या अनुभवानुसार विद्यार्थ्यांचे मुल्यमापन करावे, असेही सूचित केले आहे. तसेच विद्यार्थ्यांसाठी 20 टक्के क्रेडीट देण्याच्या सुचनाही यात करण्यात आल्या आहेत. दरवर्षी लाखो विद्यार्थी हे पदवी अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतात. या विद्यार्थ्यांना परिपूर्ण शिक्षण मिळावे व ते नोकरीस सक्षम व्हावे या उद्देशाने हा बदल करण्यात आला आहे. यासाठी उद्योागांचे विचारही लक्षात घ्याव्यात असेही मार्गदर्शक सुचनांमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. ही इंटर्नशिप कोणत्याही स्थितीत कॉलेज कॅम्पसमध्ये न होता कंपन्यांमध्ये व्हावी. त्यासाठी शैक्षणिक संस्थांनी कंपन्यांशी सामंजस्य करारही करावा व मुल्यमापन करताना कंपनीकडून येणारे मूल्यांकनही विचारात घ्यावे असेही यात स्पष्ट करण्यात आले आहे.