महाराष्ट्र न्यूज मसूर प्रतिनिधी :
हेळगावने नेहमीच अध्यात्माची कास धरत गावात धार्मिक व एकीचे वातावरण जपले आहे. गावातील पारायण सोहळा असो, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव,किंवा मासिक एकादशी कार्यक्रम असो हे सर्व उत्सव समस्त ग्रामस्थ एकत्र येऊन मोठ्या उत्साहात साजरे करत असतात. या धार्मिक वृत्तीच्या कार्यक्रमामुळे भावी पिढीलाही त्याचा उपयोग होणार असून हेळगावने अध्यात्माची ही परंपरा कायम राखावी असे आवाहन व्यसनमुक्त युवक संघटनेचे संस्थापक ह. भ. प. बंडातात्या कराडकर यांनी केले.
हेळगाव ता. कराड येथे विठ्ठल रुक्मिणी मंदिर स्थलांतराच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी सरपंच सौ. शारदा जाधव, उपसरपंच संजय सूर्यवंशी, माजी पंचायत समिती सदस्य अशोकराव संकपाळ, माजी सरपंच बाळासाहेब जाधव, सोसायटीचे संचालक सुभाष पाटील, ग्रामपंचायत सदस्य ओंकार उर्फ कौस्तुभ सूर्यवंशी, विक्रम कुंभार आदींची प्रमुख उपस्थिती होती.
बंडातात्या कराडकर पुढे म्हणाले हेळगाव ग्रामस्थांनी सर्व देवतांची मंदिरे एकाच ठिकाणी घेऊन सुसज्ज असे सभागृह उभारले आहे. विविध धार्मिक, सामाजिक कार्यक्रमासाठी सर्वसामान्यांना परवडेल असे हे सभागृह हेळगावसह परिसरातील जनतेला किफायतशीर ठरेल.
ह. भ. प. बंडातात्या कराडकर, सौ व श्री नामदेव पवार, सरपंच शारदा जाधव, हभप काकासाहेब सूर्यवंशी, सुरेश पाटील, सुभाष पाटील आदी मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन समारंभ पार पडला.
सूत्रसंचालन माजी सरपंच बाळासो जाधव यांनी केले. स्वागत ह भ प सुरेश पाटील यांनी केले. आभार ग्रामपंचायत सदस्य विक्रम कुमार यांनी मानले.
कार्यक्रमास उद्योजक मिलिंद पाटील, सोसायटीचे माजी चेअरमन अशोक चव्हाण ,सदाशिव पवार,हणमंत पाटील, तंटामुक्तीचे अध्यक्ष श्रीमंत सूर्यवंशी, सुरेश शिंदे, रामचंद्र पाटील, प्रज्योत कुलकर्णी, सुभाष कदम, बापूराव संकपाळ, अनिल कणसे सचिन सूर्यवंशी अजय सूर्यवंशी शिवाजी सूर्यवंशी आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.






















