महाराष्ट्र न्यूज इंदापूर प्रतिनिधी : शहाजीराजे भोसले
इंदापूर तालुक्यामध्ये अतिवृष्टी व पूर परिस्थिती एकाच वेळी निर्माण झाल्याने शेतीपिकांचे व घरांचे राज्यामध्ये सर्वाधिक नुकसान झालेले आहे. मात्र सध्या नुकसानग्रस्त पिकांचे व घरांचे सरसकट पंचनामे केले जात नसल्याच्या तक्रारी येत आहेत. पंचनाम्याअभावी एकही नुकसानग्रस्त शेतकरी व नागरिक वंचित नये, त्याकरिता शासनाने नुकसानग्रस्त सर्व पिकांचे व घरांचे सरसकट पंचनामे पुर्ण करावेत, अशी मागणी भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी रविवारी (दि.२५) केली आहे.
ते पुढे म्हणाले , इंदापूर तालुक्यात व जिल्ह्यामध्ये दि. १४ व १५ ऑक्टो. रोजी अतिवृष्टी होऊन निरा व भीमा नदीला महापूर आला. त्यामुळे खरीप हंगामातील मका, बाजरी, कांदा, कडवळ आदी पिके पुर्णपणे वाया गेली. तसेच फळबागा व ऊस पिकांचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले. अजुनही शेतात पाणी आहे . त्यामुळे कधी नव्हे एवढा शेतकरी वर्ग अडचणीत आला आहे. त्याचबरोबर गावोगावच्या अनेक घरांची पुरामुळे व अतिवृष्टीने हानी झाली आहे . सध्या मात्र नुकसान झालेली खरीप पिके, ऊस , फळबागा तसेच घरांचे कालबाह्य नियम पुढे करून अनेक ठिकाणी सरसकट पंचनामे होत नसल्याने शेतकरी व नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे . त्यामुळे नुकसान भरपाई मिळणे पासून अनेक शेतकरी व नागरिक वंचित राहण्याची स्पष्ट चिन्हे दिसत आहेत .
इंदापूर तालुक्यांमध्ये झालेल्या नुकसानीची तीव्रता अधिक आहे . त्यामुळे नुकसानग्रस्त सर्व पिकांचे व घरांचे सरसकट पंचनामे करणे गरजेचे आहे . पंचनाम्याअभावी एकही नुकसानग्रस्त शेतकरी व नागरिक वंचित राहणार नाही , याची जबाबदारी प्रशासनाने घ्यावी . तात्काळ सर्व नुकसानीचे सरसकट पंचनामे पूर्ण करून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये नुकसान भरपाईची रक्कम जमा करावी , अशी मागणी हर्षवर्धन पाटील यांनी केली आहे . आम्ही सत्तेवर असताना नुकसानग्रस्त पिकांचे सरसकट पंचनामे करून शेतकरी वर्गाला वेळोवेळी मोठी आर्थिक मदत केली आहे , याचा अनुभव तालुक्यातील शेतकऱ्यांना आहे, असेही यावेळी पाटील यांनी नमूद केले . शासनाने बागायती पिकासाठी एकरी रु. ४ हजार व फळबागांसाठी १० हजार एवढी तुटपुंजी मदत जाहीर केले आहे . सदरची मदत देतानाही नुकसानग्रस्त पिकांचे सरसकट पंचनामे केले जात नाहीत , ही खेदाची बाब असल्याचे याप्रसंगी हर्षवर्धन पाटील यांनी संगितले .