महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी : गणेश पवार
सुरवडी येथील कमिन्स इंडिया लिमिटेड कंपनी विरोधात स्थानिक भूमिपुत्रांच्या न्याय हक्कासाठी काल दिनांक २७/१०/२०२० सकाळी ९ वाजल्यापासून चंद्रकांत माणिक कदम हे अंध समाजसेवक कंपनीच्या गेट समोर आमरण उपोषणास बसले असून कंपनी प्रशासनाने याची कसलीही दखल घेतली नाही.
सदर प्रकल्पात आसपासची भूमी अधिग्रहण केलेली गावे व फलटण तालुक्यातील भूमिपुत्र यांना शासकीय नियमानुसार ८०% कायमस्वरूपी नोकरीत भरती करावी अशी प्रमुख मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे.
कंपनीने सुरवडी, ढवळेवाडी, नांदल या गावातील शेकडो एकर जमीन कवडीमोल दराने विकत घेऊन यावरती कंपनी उभारली असून कंपनी प्रशासनाला वारंवार मागणी करूनही कंपनीने स्थानिक तरुणांना कंत्राटी पद्धतीने कामाला घेतले. मात्र इतर परप्रांतीय युवकांना कायमस्वरूपी नोकरीत संधी दिली जाते. याच्या विरोधात वारंवार कंपनी प्रशासनाकडे पाठपुरावा करूनही कंपनी प्रशासन कसलीही दखल घेत नाही यामुळे मी चंद्रकांत माणिक कदम आमरण उपोषणास बसलो असून माझ्या जीवितास धोका निर्माण झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी कंपनी प्रशासनाची असेल.असे त्यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.






















