महाराष्ट्र पोलिस बॉईज संघटनेचा उपक्रम
सातारा: सातारा जिल्हयाचे सुपूत्र शहीद तुकाराम ओंबळे यांनी केलेले कार्य संपूर्ण देशासाठी प्रेरणादायी आहे. शूरविरांच्या भूमीत जन्म घेतलेल्या शहीद तुकाराम ओंबळे यांना आदरांजली वाहताना, लवकरात लवकर त्यांचे स्मारक उभारले जावे, हीच त्यांना खरी श्रध्दांजली ठरेल, अशी भावना सातारा जिल्हा महाराष्ट्र पोलिस बॉईज संघटनेचे जिल्हाध्यक्ष सरदार (सागर) भोगावकर यांनी व्यक्त केली.पुढे बोलताना श्री. भोगावकर म्हणाले की, जावली तालुक्यातील शहीद तुकाराम ओंबळे यांनी आपल्या प्राणाची आहुती देत 26/11 च्या हल्ह्यातील क्रूरकर्मा कसाबला जिवंत पकडला. त्यांनी केलेल्या या कामगिरीमुळे पाकिस्तानचा खरा चेहरा संपूर्ण जगासमोर आला आहे. परंतु त्यांच्या स्मारकाचे काम आजही रखडलेले आहे ही गोष्ट वेदनादायी आहे.
त्यांच्या स्मारकाचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे यासाठी आपण पाठपुरावा करणार असल्याचेही यावेळी श्री.भोगावकर यांनी नमूद केले. शहिद दिनाचे औचित्य साधून कोविड संकटकाळात आपली भूमिका चोख बजावत या महामारी विरोधातील लढाईत कार्यरत असलेल्या पोलिस दलातील अधिकारी व कर्मचार्यांना गुलाबपुष्प देवून त्यांचा सन्मान केला. यावेळी कार्यकर्त्यांनी ‘ना जातीसाठी ना पातीसाठी एक दिवस पोलिस बांधवांसाठी’ अशा शब्दांत पोलिस बांधवांना शुभेच्छा दिल्या. देशसेवा बजावत असताना आपल्या प्राणांची आहुती देणार्या देशाच्या सुपुत्रांना आज सातारा जिल्हा महाराष्ट्र पोलिस बॉईज संघटनेच्या वतीने श्रध्दांजली अपर्ण करण्यात आली. प्रारंभी पोवई नाका येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास कर्नल पराग गुप्ता व सुभेदार मेजर उदय पवार यांच्या हस्ते पुष्पहार अपर्ण करण्यात आला.
यावेळी कर्नल पराग गुप्ता, सुभेदार मेजर उदय पवार, सातारा जिल्हाध्यक्ष सरदार (सागर) भोगावकर, सातारा जिल्हा महिला युवा अध्यक्षा प्रियांका तोरस्कर, सातारा तालुका युवा अध्यक्ष प्रणाली डाळवाले, युवा आघाडी अध्यक्ष प्रकाश गायकवाड, अविनाश मेघावने, अभिषेक शिंदे, बापू सोरटे यांच्यासह पोलिस बॉईज संघटनेचे विविध पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.






















