कराड : एसटीचे शासनात विलगीकरण करावे या मागणीसाठी तीन आठवड्यांपासून सुरू असलेला एसटी कर्मचाऱ्यांचा संप अजुनही सुरुच आहे. शासनाने कर्मचाऱ्यांना तातडीने कामावर हजर होण्याचे आवाहन केले आहे. मात्र तरीही कामावर हजर न झाल्याने आज शनिवारी कऱ्हाड (जि.सातारा) येथील एसटी आगारातील चार कंत्राटी कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त करण्यात आली असुन १२ कर्मचाऱ्यांना निलंबीत करण्यात आल्याची माहिती कऱ्हाड आगार व्यवस्थापक विजय मोरे यांनी दिली.
एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलगीकरण करण्यात यावे, या मागणीसाठी राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन सुरु केले आहे. त्यामुळे प्रवाशी, विद्यार्थी यांची मोठी गैरसोय होत आहे. संपाचा विचार करुन परिवहन मंत्री अनिल परब यांनी कर्मचाऱ्यांना ४१ टक्के पगारवाढ केल्याचे सांगितले आहे. मात्र, कर्मचाऱ्यांनी शासनात विलीनीकरण हा मुद्दा लावुन धरला असुन आंदोलन सुरूच ठेवले आहे. या परिस्थितीमुळे सतत वर्दळ असलेल्या बस स्थानकांमधील वाहतूक ठप्प झाली आहे.
दरम्यान शासनाने एसटीच्या कर्मचाऱ्याना कठोर निर्णय न घेण्यासाठी तातडीने कामवर हजर रहावे, असे आवाहन केले आहे. मात्र तरीही अनेक कर्मचारी संपावर ठाम आहेत. त्यामुळे एसटीच्या प्रशासाने कठोर निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. त्याअंतर्गत कऱ्हाड एसटी आगारातील चार कंत्राटी कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त करण्यात आली आहे. तर पाच चालक, पाच वाहक आणि दोन कार्यशाळा कर्मचारी असे १२ कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. अजुनही कर्मचाऱ्यांनी वाईट कारवाईची वेळ न आणता सामंजश्याने कामावर हजर व्हावे, असे आवाहन कऱ्हाड आगार व्यवस्थापक मोरे यांनी कर्मचाऱ्यांना केले आहे.