महाराष्ट्र न्यूज मसूर प्रतिनिधी :
फक्त निवडणुकीपुरते गावात येऊन जनतेची दिशाभूल करणारे तथाकथित विरोधक विकासकामे करायला येत नाहीत. हा विरोधकांचा इतिहास आहे. त्यामुळे जनतेने अशा दिशाभूल करणार्यांपासून सावध रहावे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे शिक्षण व अर्थ समितीचे सभापती मानसिंगराव जगदाळे यांनी केले.
पाडळी, ता. कराड येथे राज्याचे सहकार व पणन तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या व्यायामशाळेच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन व जिल्हा परिषदेचे शिक्षण व अर्थ क्रीडा समितीचे सभापती मानसिंगराव जगदाळे यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या पाणंद रस्त्याचे डांबरीकरण केलेल्या रस्त्याचे उद्घाटन जगदाळे यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते.
सभापती जगदाळे म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस ही विकासाची साखळी आहे. जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या माध्यमातून पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक गाव विकासमय होत आहे. केवळ निवडणुकीपुरते येऊन जनतेची दिशाभूल काही नेते, पुढारी करत आहेत. त्यांच्यापासून सावध रहावे, असे आवाहन त्यांनी केले.
याप्रसंगी पंचायत समितीचे सदस्य रमेश चव्हाण, तानाजीराव जाधव, राष्ट्रवादी काँग्रेस कराड उत्तरचे उपाध्यक्ष शिवाजीराव जाधव, माजी सरपंच अरविंद जाधव, निवासराव जाधव, गोसावीवाडीचे पवार, गायकवाडवाडीचे सरपंच संदीप गायकवाड, प्रकाश वाघमारे, राहुल जाधव, शिवाजी भोज, महंतराव अवघडे, भरत जाधव यांच्यासह पाडळी, गायकवाडवाडी, गोसावेवाडी येथील पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.






















