वरळी येथील बीडीडी चाळ पुनर्वसन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी रहिवाशांनी सहकार्य करावे, असे आवाहन गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी केले.
गृहनिर्माण मंत्री डॉ. आव्हाड यांनी आज वरळी येथील बीडीडी चाळीच्या पुनर्वसन प्रकल्पाच्या कामाचा आढावा घेतला आणि स्थानिकांसोबत चर्चा करून अडचणी जाणून घेतल्या.
उपस्थित चाळवासींयांचे अभिनंदन करून डॉ. आव्हाड पुढे म्हणाले, वरळीच्या लोकांनी शासनावर विश्वास ठेऊन सहकार्य केले आहे. काही लोकांनी करार न करताही स्थानांतर केले आहे. तुम्हा सगळ्यांचे सहकार्य मिळाले तर लवकरच हा पुनर्वसन प्रकल्प पूर्ण होईल. करार करतांना अनेक गोष्टींचा अंतर्भाव करण्यास सांगण्यात आले आहे. शासनावर विश्वास ठेवा. नवीन तंत्रज्ञान वापरून ही इमारत येत्या दोन ते तीन वर्षात तयार होईल.
महिलांना भावनिक आवाहन
यावेळी डॉ.आव्हाड यांनी उपस्थित महिलांना भावनिक आवाहन केले. ते म्हणाले, तुम्हाला सुसज्ज स्वयंपाकघर मिळेल, न्हाणीघर आणि मोकळी जागाही मिळेल. सून म्हणून चाळीत येतांना बघितले असेल असे स्वप्न या पुनर्वसन प्रकल्पाच्या माध्यमातून पूर्ण होईल. पुरूष मंडळी कामावर निघुन गेल्यावर आपल्याला घरात राहायचे असते. हे असे सुंदर सुसज्ज घर आपणास मिळणार आहे.
इथे उपस्थित जनतेच्या मनातील विविध प्रश्नांना डॉ. आव्हाड यांनी उत्तरे दिली. सगळे करार लवकर पूर्ण केले जावेत. इथल्या इथेच करार होतील असे पाहिले जाईल. पोलीस खात्यातील अनेक लोक गेली कित्येक वर्ष इथे राहतात. त्यांचा सहानुभूतीपुर्वक विचार केला गेला आहे. त्यांनाही इथे घरं मिळणार आहेत. समुद्राचा वारा घरांवरून जाईल. मोकळी जागा जास्त मिळेल. मस्जिद, मंदीर, बुद्धविहारसाठीची जागा आहे तेवढीच राहणार आहे. एकदा प्रकल्प उभा राहिला की इतरांना विश्वास वाटेल. सगळे करार संकेतस्थळावर टाकण्यात येतील म्हणजे सर्वांना वाचण्यासाठी उपलब्ध होतील. करारनामा प्रत्येकालाच मिळेल. तीन वर्षात घरे तयार होतील ज्या खोलीवर मालकीचे वाद आहेत त्या खोल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नावाने राहतील असेही डॉ. आव्हाड यांनी रहिवाशांच्या प्रश्नाला उत्तर देतांना सांगितले.
यावेळी माजी राज्यमंत्री सचिन अहिर, गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव मिलींद म्हैसकर, म्हाडाच्या मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाचे मुख्य अधिकारी डॉ. योगेश म्हसे व अन्य मान्यवर मंचावर उपस्थित होते.