जेजुरी ता.१४ -: जेजुरी येथे मार्तंड देवस्थानच्या वतीने खंडोबा गडाच्या पायरी मार्गावर उभारण्यात आलेल्या “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर” यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण संपन्न झाले….
सुनील निंबाळकर / पुणे प्रतिनिधी….
जेजुरीच्या मार्तंड देव संस्थानाकडून जेजुरी गडाच्या पायथ्याशी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या १२ फुटी पुर्णाकृती पुतळ्याचा लोकार्पण सोहळा शनिवारी संपन्न झाला. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी स्त्रीशक्तीची जगाला ओळख जाणीव करून दिली. अहिल्यादेवींची ओळख भारतापुरती मर्यादित नसून जगातील अग्रगण्य महिलांमध्ये त्याची नोंद घेतली गेली आहे सत्तेचा वापर समाजासाठी करताना जेजुरी सह देशभर त्यांनी सामाजिक कामातून आपला ठसा उमटवला असे प्रतिपादन ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्रातील जामखेड तालुक्यातील चौंडी येथे अहिल्यादेवींचा जन्म झाला. अहिल्यादेवींचे वडील माणकोजी शिंदे यांनी मुलींना शिकवण्याचे महत्त्वाचे काम केले. मल्हारराव होळकर यांच्या त्या सून होत्या. खंडेराव यांच्या अकाली मृत्यूनंतर मल्हाररावांनी अहिल्यादेवींना सती जाऊ दिले नाही. मल्हाररावही गेल्यानंतर अहिल्यादेवींनी माळवा प्रांताचा कारभार उत्तमरीत्या केला. वेळप्रसंगी इंग्रजांविरोधात संघर्ष केला. पेशव्यांनी इंग्रजांशी जवळीक केल्यानंतर पेशव्यांना खडसवण्याचे कामही त्यांनी केले. अहिल्यादेवी यांची ओळख फक्त भारतापुरती मर्यादित नाही. एका ब्रिटिश लेखकाने अहिल्यादेवींची तुलना रशियाची राणी कॅथेरीन द ग्रेट, इंग्लंडची राणी एलिझाबेथ आणि डेन्मार्कची राणी मार्गारेट यांच्याशी केली आहे.
या देशात अनेक ठिकाणी मंदिरे, नदीघाट त्यांनी बांधले. जी मंदिरं जुनी झाली होती, त्यांचा जीर्णोद्धार केला. जेजुरी मंदिराची डागडुजीही त्यांनी केली होती. हाती असलेल्या सत्तेचा वापर समाजाच्या भल्यासाठी कसा करावा, याचे उत्तम उदाहरण अहिल्यादेवींनी घालून दिले आहे. अहिल्यादेवी होळकर यांनी इतिहास घडविला. जेजुरी हे महाराष्ट्राचे कुलदैवत आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातले लोक एका श्रद्धेने इथे येतात. या प्रांगणात अहिल्यादेवीचा पुतळा आरूढ होत आहे. माझी खात्री आहे इथे येणाऱ्या प्रत्येकाला हा पुतळा प्रेरणा देईल. या पुतळ्याच्या उभारणीच्या कामामध्ये अनेकांचे हात लागले आहेत. हा देश पुढे न्यायचा असेल तर स्त्री आणि पुरुष यांना एकत्रित करून अहिल्यादेवींचा आदर्श ठेवून पुढे जावे लागेल. अहिल्यादेवीचा पुतळा याठिकाणी बसवत असताना आद्य क्रांतिवीर उमाजी नाईक यांच्या पुतळ्याच्या ठिकाणी देखील सुशोभीकरण करण्यात आले आहे. शरद पवार यांनी रिमोटद्वारे अनावरण करताच भंडाऱ्याची पुतळ्यावर मुक्त उधळण झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार संभाजीराजे होते. यावेळी होळकर घराण्याचे वारस यशवंतराव होळकर, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, माजी मंत्री महादेव जानकर, आमदार संजय जगताप,आमदार अशोक पवार, आमदार रोहित पवार, संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड, जिल्हा परिषद चे अध्यक्ष विश्वास देवकाते, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष प्रदीप गारटकर, नगराध्यक्षा वीणा सोनवणे ,माजी नगराध्यक्ष दिलीप बाराभाई आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना पवार म्हणाले की राज्यात पन्नास टक्के महिलांना आरक्षण देण्याचा निर्णय आम्ही घेतला, तेव्हा तो अनेकांना आवडला नाही मात्र मागील इतिहास पाहिला तर भारतातील अनेक महिलांनी मोठे काम केले आहे कर्तुत्वाचा मक्ता फक्त पुरुषांचा नाही अहिल्यादेवींनी त्या काळात दाखवून दिले.जेजुरी त्यांनी सामाजिक काम केले त्याचा पुतळा बसून देवस्थाने चांगले काम केले आहे त्यामुळे जेजुरी खंडोबाच्या दर्शनासाठी येणाऱ्या सर्वांनाच प्रेरणा मिळत राहील. बारा फूट उंचीचा ब्रांझ धातूचामधील अहिल्यादेवींचा पूर्णाकृती पुतळा साधारण २३ लाख रुपये खर्चाचा आहे तर परिसरातील बांधकाम व सुशोभीकरणासाठी सुमारे ३२ लाख असे एकूण ५५ लाख देवस्थान संस्थान यांनी खर्च केले आहेत.शिल्पकार महेंद्र थोपटे यांनी हा पुतळा साकारला आहे .या पुतळ्याच्या जवळच छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती शहाजी राजे यांच्या भेटीचे समूहशिल्प आहे.बाजूलाच आद्यक्रांतिवीर उमाजी नाईक यांचाही पूर्णाकृती पुतळा आहे. उमाजी नाईक यांच्या पुतळ्याच्या भोवताली १५ लाख रुपये खर्चून सुशोभीकरण केले आहे. मुख्य विश्वस्त प्रसाद शिंदे यांनी प्रास्ताविकात देवसंस्थांनी केलेल्या कामाची माहिती दिली. यावेळी माजी आमदार अशोक टेकवडे, सुदामराव इंगळे, डॉक्टर दिगंबर दुर्गाडे, दत्तात्रय झुरुंगे, माणिकराव झेंडे, तहसीलदार रूपाली सरनोबत, जयदीप बारभाई, सचिन सोनवणे, महेंद्र थोपटे, उद्योजक हिंगोरानी, वसंत चव्हाण आदी उपस्थित होते. देवसंस्थांचे मुख्य विश्वस्त प्रसाद शिंदे, विश्वस्त राजकुमार लोढा, शिवराज झगडे, संदीप जगताप, अशोक संकपाळ, तुषार सहाणे, पंकज निकुडे, जेजुरी देवसंस्थांनचे व्यवस्थापक राजेंद्र जगताप, सतीश घाडगे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले होते.