पाटण प्रतिनिधी : शिक्षणाने कुटुंबाबरोबर आपल्या समाजाचा सर्वांगीण विकास साधता येतो, त्यामुळे बहुजन समाजातील विद्यार्थ्यांनी शिक्षणाला प्राधान्य दिले पाहिजे. बहुजन समाजाने शैक्षणिक क्षेत्रात प्रगती करावी असे मत ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे प्रदेश अध्यक्ष प्रवीण काकडे यांनी व्यक्त केले.
पाटण तालुक्यात अतिवृष्टीने दरडी कोसळून नुकसान झालेल्या कुटुंबाना मदत व कोरोना महामारीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या ग्रामीण भागातील गोरगरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप प्रसंगी ते बोलत होते. अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्ट व ऑल इंडिया धनगर समाज महासंघ यांच्या वतीने हा कार्यक्रम घेण्यात आला होता. पाटण तालुक्यातील डोणीचा धनगरवाडा येथील जवळपास ३० मुलांना, बोन्ध्री धनगरवाडा येथील २५ विद्यार्थी तसेच नाणेल धनगरवाडा येथील ३२ मुलांना त्यांच्या गावात जावून शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. अशा रीतीने आतापर्यंत पाटण तालुक्यातील विविध ग्रामीण भागातील बहुजन समाजातील एकूण १७९ विद्यार्थ्यांना शिक्षण उपयोगी साहित्य वाटप करण्यात आले तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मानपत्र देवून गुणगौरवही करण्यात आला.
यावेळी धनगर समाज महासंघाचे जिल्हाध्यक्ष राम झोरे, पाटण तालुका अध्यक्ष विजय ताटे, युवक आघाडी तालुकाध्यक्ष रामचंद्र यमकर, तानाजीराव येडगे, विजय यमकर, प्रशांत आखाडे, रामचंद्र लांबोर, कोमल झोरे, सुवर्ण बोडके, अनिता यमकर, रुपेश झोरे, विश्वास यमकर व विद्यार्थी उपस्थित होते.