सुनील निंबाळकर/ पुणे प्रतिनिधी :
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या पुढाकारातून मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाण मुंबई अपंग हक्क विकास मंच, पुणे जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या मंगळवारी (दि. २३) राज्यस्तरीय दिव्यांग वधू वर सूचक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. तथापि महाराष्ट्रात अचानक कोरोनाचा प्रादूर्भाव वाढताना दिसत आहे. त्यामुळे शासनाने पुन्हा एकदा सार्वजनिक ठिकाणी ५० हून अधिक नागरिकांना एकत्र येण्यास मज्जाव केला आहे. काही जिल्ह्यात जमावबंदी आणि रात्रीची संचारबंदीही लागू करण्यात आली आहे. त्यामुळे सर्वांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून हा मेळावा नियोजित २३ फेब्रुवारी २०२१ रोजी न घेता काही दिवस पुढे ढकलण्यात आला आहे. मेळाव्याची पुढील तारीख लवकरच कळविण्यात येईल, अशी माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्राद्वारे दिली आहे.