मुंबई : सकारात्मकता व इच्छाशक्तीच्या बळावर कोरोनासारख्या महामारीवर विजय मिळविण्यासाठी आपल्याला पुढील वाटचाल करतानाच जीवनातसुद्धा यशस्वी व्हायचे आहे. कोरोनाने आपल्याला सुदृढ राहायला शिकवले. सुदृढ राहा, निरोगी राहाल तर कुठलंही संकट अचानक उद्भवलं तरी ते तुम्हाला हात लावू शकणार नाही. मानसिकदृष्ट्यासुद्धा आपल्याला सशक्त राहावे लागेल, असा सल्ला आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिला.
दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरील सुरू असलेल्या ‘कोरोनाशी दोन हात’ या चर्चासत्र मालिकेच्या पाचव्या भागात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याशी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शांतीलाल मुथ्था यांनी ‘कोरोना: प्रतिकारशक्ती व इच्छाशक्तीचे महत्व’ याविषयी संवाद साधला. त्यावेळी आरोग्यमंत्री बोलत होते.
आरोग्यमंत्री श्री. टोपे म्हणाले, प्रत्येकाने आपलीप्रतिकारशक्ती चांगली ठेवावी. योग्य आहार, पुरेशी झोप आणि व्यायाम या सगळ्या गोष्टी करायला पाहिजेत. जे हंगामी सांसर्गिक आजार असतात जसे डेंग्यू व मलेरिया या सगळ्यांवर आपल्याला मात करायची असेल तर आपली प्रतिकारशक्ती चांगलीच पाहिजे. आयुष, योग, प्राणायाम, व्यवस्थितपणे आहार घेणं या सगळ्या गोष्टींचं खूप महत्व आहे. कोरोना काळात जास्त काळजी घ्यायची असेल तर वाफ घेणं, गरम पाणी पिणे, काढा घेणं यासुद्धा महत्वाच्या बाबी असल्याचे त्यांनी सांगितले.
आता आपल्याला आपलं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी शिक्षित व्हावंच लागेल. शिस्तबद्ध जीवनशैलीची सवय लावून घ्यावी लागेल. नॉन कम्युनिकेबल डिसीज म्हणजे मधुमेह, रक्तदाब, कर्करोग ज्यांच्यामुळे संसर्ग होत नाही, पण हे झाल्यानंतर आपल्या शरीरात मोठ्या प्रमाणावर अशक्तपणा निर्माण होऊ शकतो. त्यासाठीसुद्धा आपल्याला खाण्या-पिण्याच्या सवयी नीट समजून घ्याव्या लागणार आहेत. जिभेवर आणि मनावर ताबा हे सगळं प्राणायामाने, योगासनांनी योग्य पद्धतीने शिस्तबद्ध आयुष्य जगूनच करावे लागणार आहे. तर आणि तरच आपली प्रतिकारशक्ती चांगली राहू शकेल. जंक फुड खाण्यावर नियंत्रण ठेवलं पाहिजे. त्याला आता पर्याय नाही, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.
सकारात्मक दृष्टिकोन आणि इच्छाशक्ती या दोन गोष्टी तुमची ताकद आहे. बऱ्याचदा ताण खूप असतो. ‘तणावाचे व्यवस्थापन’ याविषयावर आरोग्य विभाग सुद्धा निश्चित प्रकारे काम करीत आहे.
या काळात लोकांना समुपदेशन (counselling) करणे हा महत्वाचा विषय आहे. आपल्या जीवनात आपण पुन्हा सगळे कमावू शकतो. नोकरी परत मिळेल. तुमच्या हातात कौशल्य आहे. ज्ञान आहे. सगळे परत मिळेल. बुद्धिमत्ता असेल तर व्यवसाय पुन्हा उभा राहील. कुठेही निराश होता कामा नये. खचून जाता कामा नये. हिमतीने उभे राहिले पाहिजे. खंबीरपणे उभे राहिले पाहिजे. स्वबळावर पुढे जायला पाहिजे. मला वाटतं सकारात्मक राहणे हा जीवनाचा अविभाज्य भाग असला पाहिजे. याच विश्वासावर आज कितीही वाईटातील वाईट प्रसंगातूनही मी पुन्हा उभा राहू शकतो, हीच मानसिकता निर्माण करण्याची आवश्यकता असल्याच्या मुद्दयावर आरोग्यमंत्र्यांनी भर दिला.
मनाची मशागत ही शरीराच्या मशागतीइतकीच महत्वाची आहे आणि दोन्हीची मशागत झाली तर तो मनुष्य अशा कितीही संकटांवर मात करू शकतो, असेही त्यांनी शेवटी सांगितले.