गुरुवार वेळ दुपारची दुपारी फराळ करण्यासाठी दुकानातून घरी गेलो तर माझी मुलगी सौ. पूनम आणि नात कु. राजनंदिनी घराच्या मागच्या बाजूस शेतात ऊसतोड चालू असलेली कुतूहलाने पहात असलेली दिसले..मी देखील नजर टाकली तर ते ऊसतोड पहात न्हवते तर ऊसतोड कामगारांची अगदी वयाच्या 4 महिन्याच्या बाळापासून ते 5/6 वर्षापर्यंत ची लेकरे भर उन्हात शेवरी च्या झाडाच्या थोड्याशा सावलीला खेळत होती तर काही मुले ( कुतूहलाने कदाचित ) आमच्या घराकडे..माझ्या नातीकडे,मुलीकडे पहात होते..त्या चिमुकल्यांची नजर बरंच काही सांगून जात होती..मी माझ्या मोबाईल च्या कॅमेरा मध्ये न विसरता टिपली ते दृश्य पाहून मन हेलावलं..मी काही बोलणार इतक्यात माझी नात राजनंदिनी तिच्या मम्मी ला म्हणली..” मम्मा छोटं बेबी पण आहे,आणि किती ऊन आहे ना ? त्याला त्रास होत असेल की..आणि त्या सर्व मुलांची कपडे पण मळलेली,फाटलेली आहेत ना ? त्यांना भूक पण लागली असेल ना असे एक ना अनेक प्रश्न विचारत बसली..आणि पटकन बोलली त्या मुलांना माझे कपडे आणि खाऊ द्यायचा का आपण ..माझी मुलगी आणि मी तिच्या कडे पाहत च राहिलो..लहान मुले स्वतःचं चॉकलेट दुसऱ्याने मस्करीने हातातून घेतलं तर कालवा करतात आणि ही चक्क त्या मुलांना तिचे कपडे आणि सगळा खाऊ द्यायला तयार झाली ? 4 वर्षाची राजनंदिनी आणि आत्ताच एवढी दानत , एवढी संवेदनशीलता, एवढा मोठा विचार ? असो..
माझ्या मुलीने त्या सर्व मुलांना समोरच्या बाजूने या सांगितले .. राजनंदिणी त्यांना घरात बोलवत होती पण ती मुले घाबरली असावीत कदाचित..गेट च्या पुढे यायला तयार होईनात..माझ्या नातीने तिच्यासाठी आणलेला सगळा खाऊ, रोज वापरत असलेले हाताला येतील तेवढे कपडे घेतले .. माझे पप्पा,मम्मी मला परत घेतील की असं स्वतःशीच पुटपुटत कपडे, खाऊ, तिच्या हाताने च घेत होती, आम्ही काहीच बोलायचं नाही ठरवलं ..काय द्यायचं ते देऊ दे.. सगळं सामान एका ठिकाणी करून मला आणि पूनम ला सामान घेऊन गेट वर चला म्हणली..कारण एवढं सामान ,खाऊ तिला उचलणार न्हवता..तिने चिप्स, चॉकलेट बरंच घेतलं होतं मुलांना ..पूनम ने नंतर आणखी खाऊ घरातून आणला ..त्या लेकरांच्या चेहऱ्यावर खूप मोठा आनंद होता पण त्या ही पेक्षा जास्त आनंद माझ्या नातीच्या आणि मुलीच्या चेहऱ्यावर मी पाहिला…
या पेक्षा वेगळे संस्कार काय असू शकतात ?
शब्दांकन किरण आळंदीकर
करंजेपुल,सोमेश्वरनगर