सातारा जिल्ह्यात ऑक्सिजनची मागणी दिवसेंदिवस वाढत असून पुण्याहून सातार्यासाठी 14 मेट्रिक टन ऑक्सिजन घेऊन येणारा टँकर शुक्रवारी कोल्हापूरला नेण्याचा प्रयत्न झाला. ऑक्सिजनची गरज असल्याने कोल्हापूर जिल्हाधिकार्यांनी सातारा जिल्हाधिकार्यांकडे टँकर देण्याचा आग्रह धरला. सातार्याच्या सीमेवर ऑक्सिजन टँकर थांबवून फोनाफोनीनंतर ऑक्सिजन प्रकरणावरून दोन्ही जिल्हाधिकारी आमने-सामने आले. मात्र, सातार्याचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सातार्यातील बिकट परिस्थितीचे गांभीर्य पटवून देत टँकर सातार्यातील सरकारी रुग्णालयांत रिकामा केला. सायंकाळपासून सातारा-कोल्हापूरमध्ये झालेल्या या ‘ऑक्सिजन वॉर’ची जोरदार चर्चा सुरू होती.रेमडेसिवीर इंजेक्शन्सच्या वाईल्स आणि ऑक्सिजनची उपलब्धता यावर सातारा जिल्हा प्रशासनाने जोर दिला आहे. जिल्ह्यात कोरोना रुग्णांचे मृत्यू रोखण्यासाठी दोन्हीही घटक अत्यावश्यक असल्याने जिल्हाधिकारी शेखर सिंह अहोरात्र प्रयत्न करीत आहेत. संबंधित औषध कंपन्यांसोबत असलेल्या वैयक्तिक संबंधातून गोळ्या, औषधे उपलब्ध करण्याचा सातारा जिल्हाधिकार्यांचा प्रयत्न राहिला आहे.
सध्या ऑक्सिजनची मागणी प्रचंड वाढली आहे. त्यादृष्टीने जिल्हाधिकार्यांनी जिल्ह्यातून ऑक्सिजन उपलब्ध व्हावा यासाठी काही पॉईंट सुरु करण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. मात्र तोपर्यंत जिल्ह्याचा ऑक्सिजन पुरवठा सुरळीत रहावा यासाठी जिल्हाधिकार्यांचे प्रयत्न कायम आहेत. जिल्ह्यात कोरोना संसर्ग वाढला असून 2 हजाराहून अधिक रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासत आहे. त्यामुळे दररोज जिल्हा प्रशासनाला कित्येक टन ऑक्सिजन विविध ठिकाणाहून उपलब्ध करुन द्यावा लागत आहे. सातार्यातील जिल्हा कोविड हॉस्पिटल आणि जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयास ऑक्सिजन पुरवण्याचे कंत्राट कोल्हापूरच्या ठेकेदाराने घेतले आहे. मात्र हा ठेकेदार काम करत नसल्याच्या प्रशासनाच्या तक्रारी आहेत. या ठेकेदाराचा ऑक्सिजन टँकर प्रशासनाच्या ताब्यात असल्याने या टँकरचा वापर जिल्ह्याच्या ऑक्सिजन वाहतुकीसाठी केला जात आहे. ऑक्सिजन फिडिंग पॉईंटवरही पुरेसा ऑक्सिजन मिळत नसल्याने जिल्हाधिकारी शेखर सिंह व त्यांच्या टीमला अथक परिश्रम करावे लागत आहेत. त्यातच शुक्रवारी पुण्याहून निघालेला सातार्याचा ऑक्सिजन टँकर सातारा जिल्ह्याच्या हद्दीत आल्यानंतर त्यासोबत पोलिसांचा बंदोबस्त राहिला. पुणे-बंगळूर महामार्गावरुन येणारा ऑक्सिजन टँकर सातार्याजवळील वाढे फाट्यावर आला. त्यावेळी टँकर सातारा शहरात घेण्याऐवजी ड्रायव्हर कोल्हापूर दिशेने निघाला. पोलिसांच्या लक्षात येताच त्यांनी ड्रायव्हला टँकर थांबवण्यास सांगितले. त्याचवेळी कोल्हापूरच्या दिशेने महामार्ग पोलिसांचे पथक वाढे फाट्यावर दाखल झाले. या पथकाने टँकर कोल्हापूरला घेवून जाण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे तणाव निर्माण झाला. पोलिसांच्या पथकाने एसपी अजयकुमार बन्सल यांना कल्पना दिली. एसपी बन्सल यांनी या प्रकरणाची माहिती जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना दिली. ऑक्सिजन टँकर सातार्याचा असल्याने जिल्हाधिकार्यांनी संबंधित सरकारी रुग्णालयांत तो रिकामा करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली. कोल्हापूर सीपीआरला ऑक्सिजनची आवश्यकता असल्याने कोल्हापूर जिल्हाधिकार्यांकडून सातारा जिल्हाधिकार्यांना तो ऑक्सिजन टँकर देण्याचा आग्रह होवू लागला. मात्र सातारा जिल्ह्यातच ऑक्सिजनचा तुटवडा असल्याने हा टँकर देणे शक्य नव्हते. दोन्ही बाजूंकडून जोरदार फोनाफोनी झाली. लोकप्रतिनिधींपासून मंत्र्यांपर्यंत हा विषय गेल्याचे समजते. अखेर ऑक्सिजन टँकर सातार्यातील जिल्हा कोविड हॉस्पिटल आणि जिल्हा रुग्णालयातील ऑक्सिजन टाक्यांमध्ये रिकामा करण्यात आला. त्यानंतर मोकळा झालेला ऑक्सिजन टँकर सातारा एमआयडीसीकडे रवाना झाला.
ऑक्सिजन टँकरवरून वाद नाही
दरम्यान, या नाट्यमय घडामोडी सुरु असताना कोल्हापूर जिल्ह्यासाठीचा ऑक्सिजन टँकर कराडपर्यंत पोहोचला होता. सातार्यास ऑक्सिजन पुरवठा करणारा टँकर हा कोल्हापूरच्या ठेकेदाराचा असल्यामुळे त्याचा वापर कर्नाटकातील बेल्लारी व अन्य भागातून ऑक्सिजन आणण्यासाठी केला जाणार असल्याचे समोर आले. त्यासाठी हा सर्व खटाटोप झाला. मात्र सातारा जिल्हा प्रशासनाने हा डाव हाणून पाडला.
सातारा आणि कोल्हापूर जिल्हा प्रशासनात टँकरवरून निर्माण झालेल्या तणावग्रस्त परिस्थितीवर सातारा जिल्हा प्रशासनाने खुलासा केला आहे. ऑक्सिजन टँकरवरून कोणताही वाद होण्याचा प्रश्न नाही. कोल्हापूर ऑक्सिजन ही मोठी खासगी ऑक्सिजन सप्लाय कंपनी आहे. ती अनेक जिल्ह्यांना ऑक्सिजन पुरवते. हा ऑक्सिजन सातारा येथील क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयासाठी आला आहे, असा खुलासा सातारा जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आला.