पाटण प्रतिनिधी/ श्रीगणेश गायकवाड : संपूर्ण देशात पसरलेल्या कोरोना महामारीमुळे अनेक राज्यात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. कोणाला रेमडेसीवीर इंजेक्शन ची गरज आहे तर कोणाला ऑक्सिजन बेड ची गरज आहे. आणि त्याहून काही लोकांना रक्त तर काही लोकांना प्लाझ्मा ची गरज आहे. वरील पैकी दोन गोष्टी आपण तयार करू शकतो. इंजेक्शन असो कि आता तर ऑक्सिजन पण तयार करू लागलो आहोत परंतु एक गोष्ट अशी आहे कि ती कोणत्याही कारखान्यात तयार होत नाही ती म्हणजे रक्त होय. अजून पर्यंत तरी रक्ताची गरज ही फक्त रक्तदान करणाऱ्या लोकांच्या वरच अवलंबून आहे. १ मे पासून १८ ते ४४ वर्षाच्या आतील लोकांना लस द्यायचे सरकारने जाहीर केले आहे. आणि ती थोड्याच दिवसात सुरु पण होईल. पण त्यात काळजी करण्याची गोष्ट म्हणजे सगळ्यात जास्त रक्तदाते याच वयोगटातील आहेत. आणि लस घेतल्यानंतर काही दिवस रक्तदान करू शकत नाहीत त्यामुळे आगामी काळात रक्ताचा तुटवडा निर्माण होऊ शकतो त्यामुळे लस घेण्या अगोदर जर युवकांनी रक्तदान केले तर निश्चितच भावी काळात त्याचा फायदा होऊ शकतो. बहुतेक ठिकाणी स्वयंसेवी संस्था, राजकीय नेते मंडळी रक्तदान शिबिराचे आयोजन करतात परंतु सगळ्यात जास्त रक्तदाते असलेला वयोगट जर त्यामधून बाहेर पडला तर भविष्यात रुग्णांना रक्त टंचाईचा सामना करावा लागेल.
१८ वर्षावरील सर्वाना कोविड प्रतिबंधक लस दिली जाणार आहे त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा व लसीकरण मोहीम यशस्वी करावी परंतु त्यानंतर काही दिवस आपण रक्तदान करू शकणार नाही याची हि माहिती असणे आवश्यक आहे.कदाचित त्यामुळे रक्ताचा तुटवडा होण्याची शकयता नाकारता येणार नाही. बहुतांशी युवा वर्ग सामाजिक बांधिलकी जपत स्वेच्छेने रक्तदान करत असतात.मात्र लसीकरणानंतर काही काळ रक्तदान न केल्याने फक्त कोरोना पेशंट नाही तर गर्भवती महिला, अपघात झाल्यावरील शस्त्रक्रिया करताना रक्ताची गरज लागते. त्यामुळे युवकांनी लसीकरण करण्यापूर्वी रक्तदान केले तर काही प्रमाणात रक्ताची गरज आपण पूर्ण करू शकतो. कोरोना विषाणू चा संसर्ग दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे पण चांगली गोष्ट म्हणजे रुग्ण बरे होऊन घरी जाण्याचे प्रमाण सुद्धा वाढले आहे.परंतु त्यासाठी इंजेक्शन, ऑक्सिजन बेड याबरोबरच कोरोना संक्रमित झालेल्या व्यक्तीला विषाणू शी लढण्यासाठी प्लाझ्मा ची सध्या मोठ्या प्रमाणात गरज भासत आहे. परंतु कोरोना रुग्णाला आवश्यक असणारा प्लाझ्मा हा केवळ कोविड आजारावर मात करून बरा झालेला व अंदाजे 30 दिवस पूर्ण केलेला व्यक्तीच प्लाझ्मा देवू शकतो पण ते डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली.रक्तातील प्लाझ्मा दान करणे हे रक्तदान करण्यासारखेच सुरक्षित आहे.त्यामुळे प्लाझ्मा दान करण्यासाठी जन जागृती करणे आवश्यक बनले आहे.
जनजागृतीची गरज
कोरोना महामारीच्या काळात आपण सर्वजण कोरोना मुक्तीसाठी प्रयत्न करत आहोत.त्यातच सामाजिक कर्तव्याची जाणीव ठेवून कोविड रुग्णा करिता रक्तदान व प्लाझ्मा दान केल्यास रक्ताचा तुटवडा भासणार नाही. परंतु त्यासाठी समाजात जनजागृती करणे आवश्यक आहे.यात प्रामुख्याने युवा वर्गाने पुढे येण्याची गरज आहे.