सर्व सोयींनीयुक्त उभारले 30 बेडचे कोरोना विलगीकरण कक्ष
सातारा – कोरोना महामारीने आपली पाळेमुळे आता ग्रामीण भागात अधिक घट्ट करण्यास सुरुवात केली आहेत. ग्रामीण भागातच रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे तेथील आरोग्य व्यवस्था अपुरी पडत आहे. अशातच ग्रामीण भागात एकत्र कुटुंब पद्धती अथवा घरांमध्ये वेगळ्या खोली नसल्याचे संसर्ग घरात सर्वांना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशातच तासगाव हे पंचक्रोशीचे गाव यामध्ये ब्राह्मणवाडी, भोसलेवाडा, धोंडेवाडी, व मुळीकवाडी यांचाही समावेश असून येथील कोरोना बाधितांची संख्या 100 पेक्षा जास्त झाल्यामुळे वेळीच याला आळा बसावा याकरता ग्रामपंचायत तासगाव व तरुण युवकांच्या माध्यमातून सुसज्ज असे 30 बेड चे श्री सिद्धेश्वर कोरोना विलगीकरण कक्षा ची उभारणी करून नागरिकांना चांगली सोय देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात आलेला आहे.
अनेक ग्रामस्थही याचा फायदा घेत आहेत, तर काहीनी आपला विलिनीकरणाचा 14 ते 17 दिवसाचा वेळ पूर्ण करून बरे होऊन आनंदाने आपापल्या घरी गेले आहेत. अशा सुसज्ज विलिनीकरण कक्षामध्ये नागरिकांच्या सोयीसाठी अत्यावश्यक म्हणून ऑक्सीजन मशीन, सॅनिटायझर, प्रत्येक खोली मध्ये पंखे, आंघोळीसाठी गरम पाणी, पिण्यासाठी स्वच्छ पाणी, तसेच सकाळी चहा अथवा दूध नाष्टा व दुपारी चहा बिस्कीट याचीही सोय त्याठिकाणी करण्यात आलेली आहे. विलीनीकरण कक्ष व परिसराची दररोज हायपोक्लोराइडने फवारणी केली जाते. आरोग्य अधिकाऱ्यांच्या मदतीने या ठिकाणी दररोज रुग्णांची तपासणी करून योग्य ते मार्गदर्शन करण्यात येते. या उपक्रमामुळे तासगाव ग्रामपंचायतीचे तालुका व जिल्हा स्तरावर कौतुक होत असून इतर गावांनीही असा उपक्रम हाती घेणे गरजेचे आहे.




















