कराड : प्रतिनिधी कराड तालुक्यातील येळगाव व गोटेवाडी येथील बंधारा प्रकल्पाच्या भूसंपादित शेतक-यांना खा.श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नातून 8 कोटी 11 लक्ष रूपयांचा निधी सातारा जिल्हा मृद व जलसंधारण विभागाकडे वर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे अनेक दिवसापासून प्रतीक्षेत असलेल्या संपादित जमिनीचा मोबदला मिळणार असल्याने संबंधित प्रकल्पग्रस्त शेतक-यांना मोठा दिलासा मिळाला आहे. येळगाव आणि गोटेवाडी येथील चांभार टेक परिसरात जलसंधारण विभागाकडून सुमारे 38 हेक्टर हद्दीत जमीन संपादित करून त्याठिकाणी बंधारा बांधला आहे. सन 2010 ला सुरुवात झालेला हा प्रकल्प 2014 साली ग्रामस्थांच्या सहकार्याने पूर्ण झाला. मात्र प्रकल्पासाठी संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला अद्याप मिळाला नसल्याचे संबंधित शेतकऱ्यांचे म्हणणे होेते. याबाबत सदर प्रकल्पग्रस्त शेतक-यांनी खा.श्रीनिवास पाटील यांची भेट घेऊन यासंदर्भात प्रयत्न करण्याची विनंती केली होती.
त्यानुसार खा.श्रीनिवास पाटील यांनी राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री ना.शंकरराव गडाख व जलसंधारण महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक सुनिल कुशिरे यांना पत्रव्यवहार करून पाठपुरावा केला होता. खा.श्रीनिवास पाटील यांनी केलेल्या प्रयत्नाला यश आले असून या दोन योजनांसाठी 8 कोटी 11 लक्ष निधी महाराष्ट्र जलसंधारण महामंडळाकडून सातारा जिल्हा मृद व जलसंधारण विभागाकडे वर्ग करण्यात आला आहे. तशी माहिती जलसंधारण महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक सुनिल कुशिरे यांनी खा.श्रीनिवास पाटील यांना पत्राद्वारे कळवली आहे. हा निधी वर्ग करण्यात आल्याने येळगाव व गोटेवाडी येथील भूसंपादित शेतक-यांना मोबदला मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. त्यामुळे संबंधित प्रकल्पग्रस्त शेतक-यांना मोठा दिलासा मिळाला आहे.