दैनिक महाराष्ट्र न्यूज २३ / ०१ / २०२२
सातारा :
सातारा शहर उपनगरातील संगमनगर येथील 24 वर्षीय विवाहितेचा छळ मृत्यू झाला. सासरच्या लोकांकडून तिला बेदम मारहाण झाल्याने त्यात तिचा मृत्यू झाला असल्याचा आरोप माहेरच्या मंडळींनी केला.त्यानंतर सासर असलेल्या अपार्टमेंट बाहेर माहेरच्या लोकांनी ठिय्या मांडला होता. सातारा पोलिसांनी सासरच्या लोकांविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.सातारा सिव्हील व पोलिस सहकार्य करत नसल्याने विवाहितेच्या कुटुंबियांनी पोलिस ठाण्यासमोरच शुक्रवारी रात्री ठिय्या मांडल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
दरम्यान, शवविच्छेदन पुणे येथे केल्याने त्या अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण समोर येणार आहे. पती शंकर काळूराम भोळे, सासू लिलाबाई काळूराम भोळे, दीर राजेंद्र काळूराम भोळे, जाउ स्वाती राजेंद्र भोळे (सर्व रा. संगमनगर, सातारा) या संशयित आरोपींवर खुनासह विविध कमलान्वये गुन्हा दाखल झाला आहे.
यामध्ये सुजाता शंकर भोळे (वय 24, रा. संगमनगर, सातारा) असे मृत्यू झालेल्या विवाहितेचे नाव आहे. दरम्यान, सुजाताचे चुलते अतुल दत्तात्रय धुमाळ (वय 48, रा. घोरपडे पेठ, पुणे) यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिलेली आहे. सुजाताला आई व वडील नाहीत. तिचा लहानपणापासून तक्रारदार चुलत्यांनी सांभाळ केलेला आहे.