जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले यांच्या प्रयत्नांना यश
सातारा :माजी मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या स्मरणार्थ सातारा येथे स्मारक सभागृह उभारण्यासाठी 7 कोटी 69 लाख एवढा निधी शासनाने मंजूर केल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उदय कबुले यांनी दिली. याबाबतचा प्रस्ताव तयार करून जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले, उपाध्यक्ष प्रदीप विधाते, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा जीसी यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. उपमुख्यमंत्री अजित पवार, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांनी वारंवार पाठपुरावा केला आणि त्याला यश येऊन सात कोटी 69 लाख इतका निधी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्मारक सभागृहासाठी मंजूर झाला आहे. एका स्वतंत्र आदेशान्वये हा निधी वितरित करण्यात येत असल्याचे ग्रामविकास विभागाने शासन निर्णयाद्वारे कळविले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी सातत्याने चर्चा करून आणि पाठपुरावा करून अखेर ग्रामविकास विभागाने या प्रस्तावास हिरवा कंदील दाखवला आहे. या महत्त्वाच्या निर्णयामुळे शासनाचे विविध स्तरातून आभार मानले जात आहेत. या स्मारक सभागृहाचे काम लवकरच सुरू करण्यात येत असल्याची माहितीदेखील प्रसिद्धीपत्रकात देण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य इमारतीच्या आवारात स्वर्गीय यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृहाशेजारी हे स्मारक सभागृह आकर्षक पद्धतीने उभे राहणार आहे. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या कार्यकर्तृत्वाने आणि पदस्पर्शाने पुनीत झालेल्या सातारा नगरीमध्ये हे स्मारक सभागृह उभे राहत आहे ,याचा विशेष आनंद आणि अभिमान आहे, असे देखील श्री. कबुले यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाला साजेसे स्मारक सभागृह उभे राहणार आहे. त्यासाठी संपूर्ण संबंधित यंत्रणा काटेकोर नियोजन करीत आहे .
संग्रहालय, कलादालन, प्रदर्शन दालन, वाचनालय, मिटींग हॉल, विश्रामग्रह यासोबतच परिसर सुशोभीकरण, विद्युतीकरण, वातानुकूलित यंत्रणा असे सर्वांगपूर्ण ,सुसज्ज असे हे स्मारक असणार आहे. हे स्मारक वेळेत आणि सर्वांगपूर्ण व्हावे म्हणून जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा स्मारक समिती गठीत करण्यात आली आहे. स्मारकाचा आराखडा तयार असून त्यामध्ये तळमजल्यावर वाहनतळ, पहिल्या मजल्यावर प्रदर्शन दालन आणि मिटिंग हॉल तसेच बैठक दालन तर दुसऱ्या मजल्यावर विश्रामग्रह आणि वाचनालय उभे राहणार आहे. त्यासोबतच अंतर्गत रस्ते ,परिसर सुशोभीकरण संरक्षक भिंत व इतर अनुषंगिक बाबी देखील प्रस्तावित आहेत. नामवंत वास्तुशास्त्रज्ञ रवींद्र कदम यांनी स्मारकाचा सर्वसमावेशक उत्कृष्ट आराखडा तयार केला आहे, अशीदेखील माहिती या प्रसिद्धीपत्रकात देण्यात आली आहे. हे स्मारक स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या कार्यकर्तृत्वाचाचे कायमचे निदर्शक ठरेल. लोकाभिमुख नेतृत्व, उत्कृष्ट वक्ता ,प्रभावी साहित्यिक असे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचे चतुरस्र व्यक्तिमत्त्व होते. या भव्य आणि सर्वांगपूर्ण स्मारक सभागृहाच्या निमित्ताने त्यांच्या स्मृतींचे निरंतर जतन केले जाईल आणि हे स्मारक साताऱ्याची शोभा वाढवेल, असा विश्वास श्री उदय कबुले आणि श्री प्रदीप विधाते यांनी व्यक्त केला. यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव उपस्थित होते*