आढावा बैठकीत केल्या उपयुक्त सूचना
सातारा : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा जीसी यांनी कोरोना पार्श्वभूमीवर कराड तालुक्यात विविध कोरोना केअर सेंटर , ग्राम विलगीकरण कक्ष, प्राथमिक आरोग्य केंद्र इत्यादी ठिकाणी भेटी देऊन सविस्तर पाहणी केली आणि उपयुक्त सूचना केल्या. तसेच; त्यानंतर तालुकास्तरीय आढावा बैठक घेतली. बैठकीला विविध अधिकारी उपस्थित होते .यावेळी त्यांनी विविध सविस्तर सूचना केल्या. त्यांनी तळबीड ग्राम विलगीकरण कक्षाचे कौतुक केले. शंभर टक्के संस्थात्मक विलगीकरण असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. स्वयंसेवक अत्यंत उत्साहाने काम करीत आहेत, असे नमूद करुन त्यांनी इतर ग्रामपंचायतींना, हा आदर्श घ्यावा असे आवाहन केले. मसूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नियोजनाचे त्यांनी कौतुक केले. तसेच लोकप्रतिनिधींचे देखील या बद्दल आभार मानले . नमुने घेण्याची केंद्र स्वतंत्र असावेत अशा सूचना त्यांनी दिल्या. त्यांनी किवळ येथील गाव विलगीकरण कक्षाला भेट दिली .सर्व 46 पेशंट चे रक्त नमुने तपासले आहेत .इतर कोरोना केअर सेंटर आणि प्राथमिक आरोग्य केंद्र यांनी याच पद्धतीने काम करावे अशा सूचना त्यांनी दिल्या. सह्याद्री कृषी महाविद्यालयातील कोरोना केअर सेंटरला त्यांनी भेट दिली. सुविधा चांगल्या आणि मोठ्या प्रमाणात आहेत. ऑक्सिजन पातळी , पल्स रेट सातत्याने तपासावेत. 94 पेक्षा कमी ऑक्सिजन पातळी असतील तर डीसीएचला तत्काळ संदर्भित करावे. डीसीएचसी तसेच ग्रामीण रुग्णालयाचे आणि रुग्णवाहिकांची नंबर तत्काळ संपर्कासाठी जाहीर करावेत. जेणेकरून संपर्क साधता येईल. 1077 नंबर ला बेड उपलब्धतेसाठी संपर्क करावा .कराड तालुक्याची आढावा बैठक त्यांनी सविस्तर घेतली. यावेळी उपविभागीय अधिकारी, तहसीलदार ,गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, नगरपालिका ,मुख्य अधिकारी , गटशिक्षणाधिकारी,बाल विकास प्रकल्प अधिकारी उपस्थित होते. यावेळी त्यांनी विविध उपयुक्त सूचना केल्या. “चाचण्यांची संख्या वाढवावी. सध्या पॉझिटिव्हिटी रेट 18 टक्के आहे तो कमी करून दहापेक्षा कमी येईल याची काळजी घ्यावी. नगरपालिका क्षेत्रात सुद्धा विलगीकरण कक्ष सुरू करावा” अशा सूचना सुद्धा त्यांनी दिल्या. कॉन्टॅक्ट ट्रेसिंग मध्ये सुधारणा व्हायला हवी. शिक्षक आणि अंगणवाडी सेविका यांनी याबाबत पुढाकार घ्यावा आणि काम करावे. कमी काम असणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्र यांनी टेस्टिंग वाढवावे, अशा सूचना देखील त्यांनी केल्या.




















