कोरोना बालक प्रबोधन सभा”
तडवळे सं. वाघोलीमध्ये यशस्वीरित्या संपन्न !
सातारा, : कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर बालकांची पूर्णतः काळजी घेणे, समाजातील सर्वच घटकांचे आद्य कर्तव्य आहे, असे प्रतिपादन सांख्यिकी विस्तार अधिकारी तथा वाठार स्टेशन भागाचे कोरोना क्षेत्रीय अधिकारी यशेंद्र क्षीरसागर यांनी केले. कोरेगाव तालुक्यातील तडवळे संमत वाघोली येथे आयोजित केलेल्या “बालक प्रबोधन सभेला” मार्गदर्शन करताना ते बोलत होते. श्री. क्षीरसागर यांच्या संकल्पनेतून प्रांत अधिकारी ज्योती पाटील यांच्या प्रोत्साहनातून हा उपक्रम प्रथमच राबविण्यात आला. बालकांमध्ये जागृती करणे अत्यावश्यक असल्याच्या पार्श्वभूमीवर ही विशेष सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी आशा सेविका, अंगणवाडी सेविका, मदतनीस, शिक्षक यांच्यासह बहुसंख्येने बालक आणि पालक उपस्थित होते.
यावेळी बालकांना समजेल अशा सोप्या भाषेत प्रबोधन करण्यात आले. श्री. क्षीरसागर म्हणाले,” मास्क वापरणे, वारंवार हात धुणे ,शारीरिक अंतर बाळगणे ही त्रिसूत्री सर्व बालकांनी देखील कटाक्षाने अवलंबावी .गर्दी मध्ये जाऊ नये. आरोग्याची विशेष काळजी घ्यावी .स्वच्छतेची विशेष काळजी घ्यावी .आयुष मंत्रालयाने, तसेच तज्ज्ञांनी सुचविलेले सर्व उपाय अवलंबावेत. हळद आणि मीठ टाकून गरम पाण्याच्या गुळण्या करणे म्हणजेच “गोल्डन वॉटर” चा उपयोग करणे, तसेच हळद टाकून आणि सुंठ टाकून गरम दूध पिणे म्हणजेच “गोल्डन मिल्क” पिणे गरजेचे आहे. खोबरेल तेल, तिळाचे तेल यांचा वापर सर्वांनी व्यवस्थित करावा. नाकपुडीमध्ये खोबरेल तेल अथवा तिळाचे तेल लावावे. दोन चमचे खोबरेल तेलाच्या गुळण्या दोन मिनिटे करून त्यानंतर हळदीच्या पाण्याच्या गुळण्या कराव्यात. च्यवनप्राश, आवळा यांचे नियमित सेवन करावे. अशा उपयुक्त सूचना श्री क्षीरसागर यांनी दिल्या. ते पुढे म्हणाले,” बालकांनी तसेच पालकांनी देखील बाहेरचे अन्न अजिबात खाऊ नये. घरात शिजवलेले ताजे गरम अन्न खावे. रोज अर्धा तास अनुलोम-विलोम तसेच प्राणायाम करावा. बालकांना योग्य वाटेल असा व्यायाम शिकविला जावा. आयुर्वेदिक आणि सशक्त जीवनशैली जगण्यास बालकांना सर्वच घटकांनी मार्गदर्शन करावे. तसेच क्रियाशील सहकार्य करावे.”
































