महाराष्ट्र न्यूज नेटवर्क सातारा, दि. २८ मार्च : उन्हाळ्यात वाढलेल्या विजेच्या मागणीमुळे महावितरण ‘सेंट्रल पॉवर एक्सचेंज’सह विविध स्रोतांकडून महागड्या दराने वीज खरेदी करीत आहे. वीज खरेदीचा खर्च व वीजबिल वसुलीचा ताळमेळ साधताना महावितरणला कसरत करावी लागत आहे. ग्राहकांनी थकबाकीसह चालू वीजबिल भरावे. अन्यथा, काही दिवसांत भारनियमन करण्याशिवाय पर्याय नाही, असे महावितरणने म्हटले आहे. राज्याची विजेची मागणी २४ हजार ५०० मेगावॉट असून महावितरण वीज पुरवठा करीत आहे. जवळपास ३१ दशलक्ष युनिट वीज महावितरणने सेंट्रल पॉवर एक्सचेंजसह विविध स्रोतांकडून १५ रुपये प्रतियुनिट दराने खरेदी करून ग्राहकांना पुरवली आहे. हीच वीज घरगुती, कृषी व विविध वर्गवारीतील ग्राहकांना महावितरणकडून सवलतीच्या दरात दिली जात आहे.
सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने विजेची मागणी वाढत आहे. देणी आणि ग्राहकांकडील वीजबिलांच्या थकबाकीमुळे महावितरण संकटात आहे. सध्या थकीत वीजबिल वसुली सुरू असून ग्राहकांचा पुरेसा प्रतिसाद नसल्याने चिंता वाढली आहे. विजतेच्या वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर वीज खरेदी आणि पैशाचा ताळमेळ घालणे अवघड झाले आहे. वसुलीचे प्रमाण कमी असताना महागडी वीज विकत घेणे महावितरणच्या आवाक्याबाहेर गेले आहे. या परिस्थितीत भारनियमनाशिवाय दुसरा पर्याय नसल्याचे महावितरणने म्हटले आहे. वीजबिल वसुली कमी असलेल्या भागात भारनियमन होण्याची शक्यता आहे. उन्हाच्या झळा वाढल्यानंतर वीजेची मागणी वाढली आहे.