मधुसूदन पतकी
खासदार उदयनराजे भोसले हे आ. शशिकांत शिंदे यांच्या वक्तव्याला किती गांभीर्याने घेतात ते लवकरच समजेल. मात्र एक नक्की, विधानसभा अध्यक्षांचा प्रश्न ज्या तीन पक्षांना एकत्रित येऊन सोडवता आला नाही, त्यांनी दुसऱ्या पक्षाच्या सदस्यांना काय मिळाले काय मिळाला नाही याचा हिशोब कशाला ठेवावा ? आणि केवळ राजकीय उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून फुकाचा कळवळा तरी कशाला दाखवावा.
शिवसेनेचे राज्यसभेचे प्रतिनिधी खा. संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे सदस्य आ. शशिकांत शिंदे यांनी भारतीय जनता पक्षातील खा. प्रीतम मुंडे आणि खा . उदयनराजे भोसले यांना केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात स्थान न दिल्याबद्दल काळजी , चिंता, हळहळ, सहानुभूती आणि कळवळा व्यक्त केला. यात त्यांचा कोणताही कसलाही राजकीय हेतू नाही असे आपण क्षणभर समजूया. खरेतर खा.उदयनराजे यांना मंत्रिमंडळ विस्तारात स्थान द्यायला पाहिजे होते असे सातारकरांना नक्कीच वाटत होते. या दरम्यान माढा लोकसभा मतदार संघाचे प्रतिनिधी खा. रणजित सिंह नाईक निंबाळकर यांचे नावही संभाव्य यादीत होते. सातारकरांसाठी हे एक सुखद स्वप्न होते. मात्र मंत्रिमंडळात या दोघांचाही समावेश झाला नाही. एका अर्थाने सातारकरांचा स्वप्नभंग झाला. अर्थात आपण पाहिले ,आपल्याला दाखवले ते स्वप्न होते ही वस्तुस्थिती सातारकरांनी प्रामाणिकपणाने हळहळत स्वीकारली. मात्र मंत्रिमंडळ विस्तारानंतर चार दिवसांनी विधानपरिषद सदस्य आ. शशिकांत शिंदे यांनी वार्ताहरांशी बोलताना सातारकरांच्या मनातली खंत प्रातिनिधिक पद्धतीने व्यक्त केली .आणि सातारकरांच्या हळव्या भावनेला वाट करून दिली . तर यापूर्वी दोन दिवस राज्यसभा सदस्य व शिवसेनेचे खा. संजय राऊत यांनी खासदार प्रीतम मुंडे यांच्या बद्दल सामना वृत्तपत्रातील अग्रलेखातून कळवळा व्यक्त केला. हा कळवळा त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात स्थान मिळाले नाही म्हणून व्यक्त केला होता. मात्र त्यापुढे जाऊन त्यांनी भाजप ,वंजारी समाजाला न्याय देत नाही .मुंडे भगिनींना राजकारणात, सत्ताकारणात सन्मानाचे स्थान देत नाही अशा आशयाने विचार आणि आरोप व्यक्त करत हा कळवळा राजकीय असल्याचे दाखवून दिले. खरे तर मुंडे भगिनी आणि भाजप यांच्यामधील हा मामला आहे. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे ही एकेकाळी भाजपच्या विरोधात बंड करण्याच्या मन:स्थितीत, परिस्थितीत आले होते.मात्र नंतर पक्ष शिस्तीला प्राधान्य देत ते पक्षात राहिले व नंतर केंद्रातही पोहोचले . त्यांचा दुर्दैवी अपघाती मृत्यु झाला नसता तर आजही ते मंत्रिमंडळात दिसले असते . गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूनंतर पक्षाने प्रीतम मुंडे यांना खासदार केले. आज त्या खासदार आहेत ,तर पंकजा मुंडे यांना विधानसभेत, पक्ष सत्तेत असताना मंत्रिमंडळात स्थान दिले होते. विधानसभेच्या पराभवानंतर भाजपच्या केंद्रीय कार्यकारणीत पंकजा मुंडे यांना पक्षाने संधी दिली. असे असताना मंत्रिपदी खा.प्रीतम मुंडे यांची वर्णी लागली नाही म्हणून भाजप मुंडे भगिनींनीकडे आणि त्याच्या समाजातून येतात त्या समाजाकडे दुर्लक्ष करत आहे हे म्हणणे विरोधकांना नक्कीच शोभते.खरेतर खा. राऊत यांच्या बंधूंना अद्याप महामंडळात जे त्यांना अपेक्षित आहे तिथे स्थान मिळाले नाही किंबहुना महामंडळांचे अद्याप वाटपही झालेले नाही. खा. राऊत महाआघाडीचे शिल्पकार आहेत. आघाडीसाठी आपला खारीचा वाटा आहे असेही ते सांगतात. असे असताना त्यांच्या बंधूंना मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही. (युतीपेक्षा महाआघाडीत मंत्र्यांची संख्या घटली आहे त्याचा फटका आपल्या बंधूंना बसला असेही ते सांगू शकतात )मग खासदार राऊत शिवसेनेवर नाराज का झाले नाहीत हे समजत नाही. त्यापुढे जाऊन श्री. उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या संपादकपदाचा राजीनामा दिल्यावर कार्यकारी संपादक पदावरून खासदार राऊत यांची संपादक म्हणून पदोन्नती झाली नाही. याचेही त्यांना दुःख झाले नाही.की इतर पक्षातील कोणालाही वैषम्य वाटले नाही. याचे कारण खा. राऊत यांची पक्षनिष्ठा हेच आहे. अर्थात तशीच पक्षनिष्ठा मुंडे भगिनींची असू शकते असा विचार खा.राऊत यांनी करायला हवा होता. अथवा खासदार राऊत कार्यकारी संपादक म्हणून खा. प्रीतम मुंडे यांच्याशी बोलून त्यांच्या काय भावना आहेत याचा विचार अग्रलेखात मांडायला हवा होता. मात्र केवळ राजकीय कळवळ्यामुळे त्यांनी तसे केले नाही. असो. मुंडे भगिनी नाराज आहेत हे तुम्हाला कोणी सांगितले हा श्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांना विचारलेला प्रश्न खा. राऊत यांना लागू होतो .पत्रकार म्हणून त्यांनी या प्रश्नाचे उत्तर द्यायला पाहिजे. आणि जर खासदार म्हणून ते लिहीत असतील तर नाराजी उगम सांगितला पाहिजे .अग्रलेख कळवळ्याचा नाही तर भाजपत काडी टाकून आग लावणाऱ्या राजकारणाचा आहे हे तरी किमान त्यांनी मान्य केले पाहिजे. अर्थात असे ते करतील असे कोणालाच वाटत नाही. मात्र दोन दिवस त्यांनी जी हवा केली ,त्यावर आम्ही नाराज नाही हे स्पष्टीकरण मुंडे भगिनींनी देऊन तो विषय संपला आहे. अग्रलेखात मागचे राजकारण शेंबड्या मुलाला समजेल इतके स्पष्ट आहे .
आ. शिंदे यांचा कळवळा
आता दुसरा प्रकार विधानपरिषद सदस्य आमदार शिंदे यांना खा.उदयनराजे भोसले, खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना मंत्रीपद न मिळाल्याच्या कळव्याचा. खा. उदयनराजे भोसले राष्ट्रवादी पक्षात असताना जिल्हा मध्यवर्ती बँक, जिल्हा परिषदेत खा. उदयनराजे भोसले यांच्या मतांना बंद लखोटा, लिफाफाच्या माध्यमातून किती व कसा सन्मान दिला जायचा हे सातारकरांनी पाहिले आहे.जिल्हा परिषदेत अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत खासदार भोसले विरुद्ध उर्वरित राष्ट्रवादी असा सामना व डावपेच रंगायचे हे उघड उघड गुपित जिल्ह्याला माहिती आहे. खा. भोसले यांनी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत सातारा विकास आघाडी म्हणून जिल्हा परिषदेची निवडणूक आत्मसन्मानासाठी लढवली होती. जिल्हा बँकेत संचालक पदासाठी ही शह-काटशह आची रणनीती कशी आखली जायची हे खरे तर प्रभुरामच जाणे. राष्ट्रवादीतून लोकसभेची शेवटची 19 सालाची सार्वत्रिक निवडणूक खा. उदयनराजे भोसले यांनी लढवली. तेव्हा त्यांनी, मला मदत न केल्यास राष्ट्रवादीच्या आमदारांना मी विधानसभा निवडणुकीत काय करायचे ते पहातो. असा इशारा दिला होता .त्यानंतर राष्ट्रवादीच्या आमदारांनी काम करण्यास प्रारंभ केला . तर राष्ट्रवादीच्या अध्यक्षांना या प्रकरणात त्यावेळी लक्ष घालावे लागले होते. मुळात त्यांना उमेदवारी मिळू नये यासाठीच मोठे प्रयत्न केले गेले होते. हा पण त्यावेळी त्यांच्या सन्मानच मुद्दा होता. तेव्हा या प्रकरणांमध्ये खा. उदयनराजे यांच्या बद्दलचा कळवळा कुठे गेला होता हा सहज पडणारा प्रश्न आहे.आ. शशिकांत शिंदे यांनी खा.भोसले यांचे राष्ट्रवादी सोडून भाजपत जाणे आणि तिथे मंत्रिपद न मिळणे हे वैयक्तिक नुकसान आहे असे सांगितले. त्यापुढे हे आमदार शिंदे यांनी आपले वैयक्तिक मत आहे असेही सांगितले एका अर्थाने हे एक बरे झाले. कारण लोकसभेच्या त्या पोटनिवडणुकीत सातारा जिल्ह्यात पावसाच्या प्रवेशाने राष्ट्रवादीचे उमेदवार श्री. श्रीनिवास पाटील विजयी झाले असले तरी जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या सातारा, कोरेगावच्या विधानसभा जागा कमी झाल्या होत्या. सध्या गाजत असलेल्या जरंडेश्वर कारखान्याच्या संस्थापिका डॉक्टर श्रीमती शालिनीताई पाटील यांना जावली मतदारसंघ बरखास्त झाल्यामुळे जावळीतून कोरेगावमध्ये येत पराभूत करणाऱ्या आ. शिंदे यांनी त्यावेळी जायन्ट किलर म्हणून लौकिक मिळवला होता. मात्र हा लौकिक आणि त्याला साजेशी कामगिरी याच पावसाच्या कृपेने आमदार शिंदे करू शकले नाहीत. राखू शकले नाहीत. आपली जागाही वाचवू शकले नाहीत .अगदी नव्या, ताज्या दमाच्या उमेदवाराने, श्री.महेश शिंदे यांनी आमदार शशिकांत शिंदे यांचा पराभव केला आणि एका अर्थाने ते महाजायंट किलर झाले. आमदार शशिकांत शिंदे यांचे ते नुकसान वैयक्तिक आणि राजकीय होते. त्याची भरपाई राष्ट्रवादीने त्यांना विधान परिषदेत जागा देऊन केली. तशीच भाजपाने खा. उदयनराजे भोसले यांना राज्यसभेची सदस्यता देऊन केली. तेव्हा वैयक्तिक फसवणूक हा मुद्दा इथे कसा लागू होईल हे स्पष्ट होणे गरजेचे आहे. राजकारणात जर-तर ला स्थान नसते पण श्रीनिवास पाटील पराभूत झाले असते तर खा. भोसले यांना मंत्रिमंडळात नक्की स्थान मिळाले असते, जसे आमदार शिंदे निवडून आले असते तर मंत्रिमंडळात नक्कीच दिसले असते. अर्थात खा. उदयनराजे भोसले हे आ. शिंदे यांच्या वक्तव्याला किती गांभीर्याने घेतात ते लवकरच समजेल. मात्र एक नक्की विधान परिषदेच्या अध्यक्षांचा प्रश्न ज्या तीन पक्षांना एकत्रित येऊन सोडवता आला नाही.येत नाही. त्यांनी दुसऱ्या पक्षाच्या सदस्यांना काय मिळाले ,काय मिळाले नाही याचा हिशोब कशाला ठेवावा? आणि केवळ राजकीय उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून फुकाचा कळवळा तरी कशाला दाखवा.!
कोविडमुळे जनता त्रासली आहे. सर्वसामान्यांचे अर्थचक्र थांबले आहे.ते कसे सुरू होईल यावर विचार आणि कृती अपेक्षित आहे . तेंव्हा आता तरी राजकारण पुरे करा एवढेच सांगणे. तुर्तास बास.!
.
मधुसूदन पतकी