महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी :
भारताच्या सीमावर्ती भागांमध्ये तणावाचे वातावरण असताना एका चिंताजनक बातमी आली आहे. फक्त २४ तासांमध्ये सीमा सुरक्षा दलाच्या (Border Security Force) ५३ जवानांना कोरोना झाला असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.. सध्या बीएसएफच्या ३४५ कोरोना अॅक्टिव्ह (Corona Active) जवानांवर उपचार सुरू आहेत. बीएसएफच्या आतापर्यंत १ हजार १८ जवानांना कोरोनाची बाधा झाली. यापैकी ६५९ जवान बरे झाले आहेत. कोरोनामुळे बीएसएफच्या चार जवानांचा मृत्यू झाला आहे.
बीएसएफचे जवान प्रामुख्याने भारत-पाकिस्तान सीमा आणि नियंत्रण रेषा तसेच भारत-बांगलादेश सीमा आणि भारत-नेपाळ सीमा या ठिकाणी कार्यरत आहेत. देशातील निवडक नक्षलवाद प्रभावी भागांमध्येही बीएसएफचे जवान कार्यरत आहेत. या व्यतिरिक्त देशात अन्य ठिकाणी आवश्यकतेनुसार सुरक्षेसाठी बीएसएफच्या जवानांची नियुक्ती वेळोवेळी केली जात आहे.
देशाच्या संरक्षणाची जबाबदारी पार पाडताना कळत नकळतपणे कोरोना रुग्णांच्या संपर्कात आल्यामुळे बीएसएफच्या जवानांना कोरोनाची बाधा झाली आहे. कोरोनाबाधीत आढळलेल्या सर्व जवानांवर उपचार सुरू असल्याची माहिती बीएसएफने दिली आहे.