मधुसूदन पतकी
काँग्रेसला स्वतःवर साठलेली राख झटकण्याची योग्य वेळ आहे. सहयोगी पक्षाकडून मिळत असलेल्या वागणुकीवर निषेध नोंदवत वा ठाम भूमिका घेतली किंवा प्रवाहाविरोधात जाण्याचे धाडस काँग्रेसने दाखवले तर आज चौथ्या क्रमांकावर असणारी काँग्रेस तिसऱ्या क्रमांकावर व ताकद लावल्यास वा सत्ता त्यागण्याची हिंमत दाखवली तर मध्यावधी निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावर ही येऊ शकते. मात्र काँग्रेस हायकमांडने श्री.पटोले यांना बळ द्यायला पाहिजे.इतर काँग्रेसजणांमध्ये चेतना निर्माण केली पाहिजे, म्हणजे पटोले यांचे टोले फलद्रूप होतील .
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी गेले दोन दिवस आपल्या सहयोगी पक्षांना लक्ष्य करत चांगलेच अस्वस्थ केले आहे. राष्ट्रवादीचे उपमुख्यमंत्री अजित पवार, ना. नबाब मलिक हे श्री. पटोले यांच्या शाब्दिक बोचकऱ्यानी यांनी चांगलेच घायाळ झाले आहेत हे त्यांच्या वक्तव्यावरून ते दिसून आले. या प्रकरणात काँग्रेसच्या पथ्यावर पडलेली बाब म्हणजे काँग्रेसची दखल सहयोगी पक्षांना घ्यावी लागली. घ्यावी लागत आहे.अन्यथा सत्ता स्थापनेपासून राष्ट्रवादी आणि राष्ट्रवादीच्या कृपाछत्र लाभलेली शिवसेनेने काँग्रेसला गृहीत धरले होते. काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे. पक्षाला मोठी परंपरा आहे. इतिहास आहे. देश स्वतंत्र झाल्यापासून सर्वाधिक काळ सत्तेत राहणारा पक्ष काँग्रेस आहे. अगदी राष्ट्रवादीचा जन्मही काँग्रेसमधून झालेला आहे. अशा या मोठ्या आणि महत्त्वाच्या पक्षाला प्रादेशिक पक्ष एकत्र येऊन एका कोपऱ्यात जखडून ठेवत असल्याचे चित्र सध्या निर्माण झाले होते. श्री. पटोले यांच्या वक्तव्यांमुळे काँग्रेसमध्ये अद्याप धुगधुगी शिल्लक आहे, हे काँग्रेसजनांना ही आता जाणवले असेल .
गृहित धरलेली काँग्रेस
दोन वर्षांपूर्वी झालेल्या विधानसभेच्या निवणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष श्री. शरद पवार यांनी शिवसेनेला बरोबर घेत सत्तास्थापनेचा घाट घातला. मात्र काँग्रेसच्या मदतीशिवाय सत्ता सोपान गाठणे शक्य नव्हते. काँग्रेस,राष्ट्रवादीचे लव्ह -हेट रिलेशन राष्ट्रवादीच्या जन्मानंतर झालेल्या सर्व निवडणुकांपासून सुरूच हे सर्वज्ञात आहे. ते आजही कायम आहे, राहील. तेव्हा काँग्रेस आणि शिवसेना यांच्यामध्ये मध्यस्थी करण्याची जबाबदारी राष्ट्रवादीची म्हणजेच श्री. शरद पवार यांची होती. ती त्यांनी यथायोग्य पद्धतीने पार पाडली. शिवसेना -राष्ट्रवादी किंवा काँग्रेस-राष्ट्रवादी अशी आघाडी संख्याबळ असते तर होऊ शकली असती. मात्र शिवसेना-काँग्रेस सह अशी आघाडी करणे कौशल्याचे उद्दिष्ट होते. हे उद्दिष्ट साध्य करताना सेना आणि राष्ट्रवादीने सत्ता स्थापनेनंतर काँग्रेसला हळूहळू गृहीत धरायला सुरू केले. राष्ट्रवादी-शिवसेनेचे मंत्री गंभीर आरोपांमुळे मंत्रिमंडळातून बाहेर पडले तरी आघाडीवर वर्चस्व आघाडीचा प्रयोग करणाऱ्या श्री. शरद पवार यांच्यामुळे राष्ट्रवादीचेच राहिले व त्यानंतर मुख्यमंत्री शिवसेनेचा म्हणून शिवसेनेचे राहिले. यात पुन्हा एकदा काँग्रेसला गृहीत धरले गेले .या गृहीत धरण्याचा पुढचा भाग म्हणजे विधानसभेचे अध्यक्ष पद आता शिवसेनेला पाहिजे असा सूर उमटू लागला आहे .अध्यक्षपदाच्या मोबदल्यात सेनेने गमावलेले वनमंत्री पद ते काँग्रेसला द्यायला तयार आहेत असेही बोलले जात आहे.हापण गृहित धरण्याचा प्रकार.
राष्ट्रवादीची पकड
आता या तीनही पक्षांची सध्याची सत्तेत आली रचना पाहिली तर राष्ट्रवादी काँग्रेसकडे गृह,अर्थ , विधान परिषदेचे सभापती पद ,उपमुख्यमंत्रीपद, अन्न नागरी पुरवठा, जलसंपदा, सहकार विपणन महत्त्वाचे म्हणजे आरोग्य ही खाती आहेत. मंत्रिमंडळात कॅबिनेट व राज्यमंत्री असेच सोळा मंत्री कार्यरत होते. यात अनिल देशमुख यांना गंभीर आरोपांमुळे राजीनामा द्यावा लागला.तरीही राष्ट्रवादीच्या पंधरा सदस्य आणि एक सभापती अशा सोळा जणांना मंत्रिमंडळात व महत्त्वाच्या ठिकाणी स्थान आहे. महत्त्वाची खाती राष्ट्रवादीकडेच आहेत.ज्या महत्वाच्या खात्यांवर त्यांचे मंत्री नाहीत त्यातल्या काही ठिकाणे राज्यमंत्री आहेत. श्री. शरद पवार यांनी याबाबत नक्कीच मुत्सद्दीपणा दाखवला व आघाडी चे शिल्प शिल्पकार म्हणून सत्तेत महत्त्वाचा वाटा स्वतःकडे राखला. सत्तेवर पकड ठेवली. या सर्व प्रकारात काँग्रेस बाजूला जात आहे याची जाणीव खुद्द काँग्रेसलाही झाली नसावी. चौथ्या क्रमांकावर असणारा हा पक्ष सत्तेत येतो आहे, या समाधानापोटी सत्ता स्थापन करण्याच्या नियम,अटी, शर्तीत मागे पडला.अती, शर्थी ठरवताना काँग्रेसने शिवसेनेकडे अधिक बारकाईने लक्ष दिले.त्यामुळे राष्ट्रवादीकडे झालेल्या दुर्लक्षच फायदा राष्ट्रवादीने घेतला. कदाचित याची जाणीव प्रकर्षाने जाणीव काँग्रेसला दोन वर्षां नंतर झाली. त्यात या सर्व प्रकाराला श्री. नाना पटोले यांनी तोंड फोडले आहे.आत्री काँग्रेसने आपला खरा हितचिंतक कोण याचा विचार केला पाहिजे.
शिवसेना आत्ममग्न
सत्तेतला दुसरा पक्ष शिवसेना हा आहे .गेल्या दोन वर्षात म्हणजेच मुख्यमंत्री होण्या पर्यंतचे त्यांचे राजकारण भावनिक पातळीवर होते. श्री.अमित शहा यांच्या बरोबर झालेली बंद खोलीत चर्चा, मुख्यमंत्री शिवसैनिकाला करणार याचे दिलेले वचन, मानापमानाच्या समजुती याला कुरवाळत शिवसेनेच्या थिंक टँक चे राजकारण सुरू होते. श्री. शरद पवार यांनी त्यांच्या भावना कुरवाळत ठेवल्या. शिवसेनेचा मुख्यमंत्री करण्याचे मान्य करून काँग्रेसलाही ते एका अर्थाने स्वीकारायला भाग पाडले. सहाजिकच शिवसेना सध्याच्या परिस्थितीवर समाधानी आहे. आत्ममग्न आहे. शिवसेनेला मुख्यमंत्री पद मिळाले आहे. मुख्यमंत्र्यांच्या घरातच कॅबिनेट मंत्रीपद पण आहे. आणि त्यांचेच ऐकणारी काही मंडळी सत्तेत आहेत. या सगळ्या प्रकारात शिवसेनेच्या गेल्या सरकारमध्ये युतीत असणाऱ्या मंत्री पदाच्या जागा कमी झाल्या तरी त्यांनी त्याच्याकडे फारसे लक्ष दिले नाही. शिवसेनेचे तेरा सदस्य मंत्रिमंडळात होते . पैकी श्री. राठोड यांना राजीनामा द्यावा लागला. आता शिवसेनेला विधानसभेचे अध्यक्षपद पाहिजे ,कारण महत्त्वाची खाती त्यांच्या हातात नाहीत याची जाणीव त्यांनाही दोन वर्षानंतर व्हायला लागली आहे. मात्र असे असले तरी बंद दाराआड झालेल्या मुख्यमंत्रिपदाच्या चर्चेचे फलित महा आघाडी सरकारचा स्थापनेने का होईना आपल्या वाट्यास आले या चिकट समाधानात शिवसेना आहे.
आता राख झटका
आता आघाडीतला तिसरा पक्ष काँग्रेस खरंतर या तिघांमध्ये राष्ट्रीय पक्ष आहे. त्यांनी घेतलेल्या एखाद्या निर्णयामुळे देशपातळीवर त्याचे पडसाद उमटू शकतात. एकेकाळी काँग्रेसवर अतिशय जहरी टीका करणाऱ्या शिवसेनेच्या नेत्यांबरोबर तसेच हिंदुत्वाचे समर्थन करणाऱ्या आणि त्यावरून काँग्रेसला लक्ष्य करणार्या शिवसेनेबरोबर सत्तेत सहभागी व्हायचे का हा काँग्रेस पुढे प्रश्न असावा. त्यांनी सत्तेत सहभागी होताना यावर योग्य तो, त्यांच्या बाजुने तोडगा काढून सत्तेत प्रवेश केला. विधानसभेच्या निकालांमध्ये चौथ्या क्रमांकावर असणारा हा पक्ष थेट सत्तेत सहभागी झाला. सत्तेत सहभाग आणि त्यानंतर मिळणारा सन्मान हे एकत्र असणे गृहीत धरले जात होते. मात्र राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्या तुलनेत काँग्रेसला नेहमीच कमी महत्त्व दिले जाते अशी कुजबूज आणि कालांतराने बैठकांमधून या कुजबुजू चे रूपांतर स्वबळावर पुढील निवडणुका लढवण्याच्या जाहीर घोषणा मध्ये झाले. राष्ट्रवादी आणि शिवसेनेची कामे तातडीने केली जातात, त्यांच्या कामांना अर्थ पुरवठा होतो ,निर्णयामध्ये विशेषतः राष्ट्रवादीचे प्राबल्य असते इथपासून आपल्या हालचालींवर सरकार लक्ष ठेवून आहे या गंभीर आरोप करण्यापर्यंत काँग्रेसची मजल गेली आहे. श्री. नाना पटोले यांनी काँग्रेसच्या मेळाव्यातच ही खंत आणि संशय व्यक्त केला. सध्याच्या परिस्थितीत शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्या संदर्भात काँग्रेसचे इतर कोणतेही नेते स्पष्ट बोलण्याचे धाडस दाखवत नाहीत. भले सकृद्दर्शनी ते अयोग्य वाटेल पण असे धाडसाने बोलण्याचे बळ काँग्रेसच्या प्रवक्ता मध्येही नाही.भाई जगताप यांचे बोलणे कोणी मनावर घेत नाही. काँग्रेस पक्षामध्ये असणारी जुनी जाणती मंडळी उदाहरणार्थ सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण किंवा मंत्रिमंडळात असलेले श्री.बाळासाहेब थोरात हे मर्यादा सोडून किंबहुना मर्यादेच्या ही खूप आत राहुनच बोलतात.तर विजय वडेट्टीवार ,यशोमती ठाकूर, डॉक्टर नितीन राऊत आदी मंडळी अजून भारतीय जनता पक्ष हाच आपला प्रमुख विरोधक आहे व त्याच्याशीच संघर्ष करण्याच्या पवित्र्यात कायम असतात. राष्ट्रीय पातळीवर त्यांचा हा विचार योग्य आहे. राष्ट्रीय धोरणाच्या संदर्भात त्यांची कृती आणि आंदोलनेही योग्य आहेत .मात्र राज्यात आपले साथीदारच आपली जागा, आपलं अवकाश कमी करण्याच्या तयारीत आहेत याचा अंदाज अजूनही काँग्रेसला आलेला नाही .सत्तेच्या माध्यमातून राष्ट्रवादी आपला प्रभाव वाढवण्याच्या प्रयत्नात आहे. तर शिवसेना संपर्क अभियान आणि विविध उपक्रमांच्या माध्यमातून आपले बळ वाढवण्याची धडपड करत आहे. श्री. शरद पवार यांनी आपआपला पक्ष वाढवणे योग्य असल्याचे प्रमाणपत्र नुकतेच दिल्यामुळे सेना व राष्ट्रवादी काही चुकीचे पाऊल उचलत नाहीत यावर त्यांनीच शिक्कामोर्तब करून टाकला आहे. कदाचित भविष्यात शिवसेना व राष्ट्रवादी अशी जोडी त्यांना श्री.पवार यांना राजकारणात प्रस्थापित करायची असेल. त्यासाठीही त्यांची ही खेळी असू शकते. मात्र या सगळ्यापासून काँग्रेस कोसो दूर आहे.काँग्रेसच्या आंदोलनांना दिशा नाही. राज्याच्या राजकारणात प्रभाव टाकू शकेल अशी व्यक्ती राज्याचे नेतृत्व करताना दिसत नाही.या पार्श्वभूमीवर श्री. नाना पटोले यांच्यासारखी व्यक्ती असा प्रयत्न करत आहे तर त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न सहयोगी पक्षांचा सुरू आहे. त्यावरही काँग्रेसजन एकत्र येऊन त्यांना मदत करताना दिसत नाहीत .सत्तास्थापनेत काँग्रेसचा वापर करायचा मात्र सत्तेतल वाटा त्यांना द्यायचा नाही. याचे कारण त्यांच्या जागा कमी निवडून आल्या हे धोरण असल्याचे सांगायचे .सध्या काँग्रेसचे बारा सदस्य मंत्रिमंडळात आहेत. त्यांची कामे करण्याबाबत काँग्रेसला मागे ठेवायचे हा सगळा प्रकार सुरू असताना काँग्रेसने आपला अधिकार,क्षमता आणि काँग्रेसत्व दाखवून द्यायला पाहिजे. मागच्या एका लेखात मी स्पष्टपणे लिहिले होते, काँग्रेसला स्वतःवर साठलेली राख झटकण्याची योग्य वेळ आहे. सहयोगी पक्षाकडून मिळत असलेल्या वागणुकीवर निषेध नोंदवत वा ठाम भूमिका घेतली किंवा प्रवाहाविरोधात जाण्याचे धाडस काँग्रेसने दाखवले तर आज चौथ्या क्रमांकावर असणारी काँग्रेस तिसऱ्या क्रमांकावर व ताकद लावल्यास वा सत्ता त्यागण्याची हिंमत दाखवली तर मध्यावधी निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावर ही येऊ शकते. मात्र काँग्रेस हायकमांडने श्री.पटोले यांना बळ द्यायला पाहिजे.इतर काँग्रेसजणांमध्ये चेतना निर्माण केली पाहिजे, म्हणजे पटोले यांचे टोले फलद्रूप होतील .
.
मधुसूदन पतकी
१३.०७.२०२१