सातारा /प्रतिनिधी : रयत स्वाभिमानी संघटनेचे कार्य कौतुकास्पद असून सर्वसामान्य जनतेबरोबरच पोलीस व प्रशासनासाठी मिळत असलेले त्यांचे सहकार्य महत्त्वपूर्ण आहे वाहतूक शाखेतील पोलीस कर्मचाऱ्यांसाठी त्यांनी दिलेली भेट कायम स्मरणात वापरात व उपयोगातही राहील, असे प्रतिपादन सातारा शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. यादव यांनी केले. रयत स्वाभिमानी संघटनेतर्फे वाहतूक शाखेच्या पोलीस कर्मचाऱ्यांना नुकतीच उच्च दर्जाच्या शूजची भेट देण्यात आली. त्या कार्यक्रमात ते बोलत होते. रयत स्वाभिमानी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सागरदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुशीलभाऊ कदम, जिल्हा उपाध्यक्ष सुमित साळुंखे, सचिव अभय जाधव, जिल्हा कार्याध्यक्ष संदिप जाधव, शहर अध्यक्ष अभिलाष बनसोडे,
सरचिटणीस निहाल इनामदार, तालुकाध्यक्ष तेजस काकडे, माथाडी आघाडीचे जिल्हाध्यक्ष मयूर कांबळे, कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष सागर पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. गणेशोत्सव व अन्य सर्व प्रकारच्या बंदोबस्तावेळी वाहतुकीला शिस्त लावण्याचे काम वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी करत असतात. शासनाच्या वतीने त्यांना योग्य त्या सेवा सुविधा मिळत असतातच मात्र सामाजिक बांधिलकीतून रयत स्वाभिमानी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सागरदादा पवार यांच्या कल्पक व दूरदृष्टीच्या सामाजिक नेतृत्वाने उच्च दर्जाच्या व उत्कृष्ट कंपनीच्या शूजची दिलेली भेट खूपच महत्त्वपूर्ण असल्याचे श्री. यादव यांनी यावेळी सांगितले. पोलीससुद्धा माणूस आहे. त्यांनाही शारीरिक व मानसिक अडचणींना सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत त्यांच्या मानसिकतेचा विचार करून त्यांना छोटीशी मदत म्हणून शूज भेट देण्याचा उपक्रम राबवला आहे. केवळ सामाजिक बांधिलकी म्हणून आपल्या पोलीस बंधू-भगिनींची काळजी घेण्याचा हा प्रयत्न आहे. भविष्यातही पोलीस बंधू-भगिनींसाठी सामाजिक भावनेतून आरोग्य शिबिरे व विविध उपक्रम राबवणार असल्याचे रयत स्वाभिमानी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सागरदादा पवार यांनी यावेळी सांगितले. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचीही यावेळी भाषणे झाली. दरम्यान या उपक्रमाबद्दल पोलीस कर्मचाऱ्यांसह नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
व्यथा समजून घेणारी रयत स्वाभिमानी संघटना
व्यथा समजून घेणारी रयत स्वाभिमानी संघटना काही वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांनीही यावेळी आपली मनोगत व्यक्त केली. त्यामध्ये अनेक संस्था, संघटना केवळ आमच्याकडून सहकार्य व मदतीसाठी फोन करतात. परंतु रयत स्वाभिमानी संघटना ही एकमेव संघटना आहे ज्यांनी आमच्या व्यथा वेदना जाणून आमच्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न केला व कर्तव्यपालन करताना वापरावयाचे उच्च दर्जाचे शूज भेट दिले, त्याबद्दल आम्ही रयत स्वाभिमानी संघटनेचे आभार मानतो असे मनोगतामध्ये सांगितले.