मधुसूदन पतकी
देशपातळीवर तिसऱ्या आघाडीची तयारी करावी तेव्हा ती राज्यात जमते नि स्था. स्वराज्य संस्थेत यामध्ये सत्ता मिळू शकते . वाघाच्या शिकारीची तयारी केली म्हणजे सशाची शिकार नक्कीच मिळते , सध्या वाघाचा ससा कसा, कोणी केला हे श्री . शरद पवार नक्कीच जाणतात. नाही का.!
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष श्री.शरद पवार दिल्ली येथे गेले . अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर ते दिल्लीत गेले असून विविध मंत्र्यांशी गाठीभेटींमुळे अनेक विषयांना उधाण आले आहे. त्यांच्या सुरू असलेल्या गाठीभेटी याचा राज्यातल्या राजकारणावर काय परिणाम होणार यावर चर्चा सुरू झाल्या आहेत. सत्ता परिवर्तनाच्या विषयांपासून ईडी पर्यंतच्या विषयांना व त्यावरील तर्कांना प्रारंभ झाला आहे.काही दिवसांपूर्वीच . श्री. शरद पवार व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटी, चर्चा व विचारविनिमय होऊन व्यूहरचना ठरवली जात असल्याची माहिती माध्यमे देत होती . त्यामुळे या सगळ्या घटनांची एक साखळी तयार होणार असेल तर प्रत्येक कडीची तपासणी करायला पाहिजे .
भाजपशी हातमिळवणी
श्री. पवार आणि इतर तीन पक्षांचा विचार केला तर काही शक्यता आगामी राजकारणात निर्माण होतात. त्यातली पहिली शक्यता श्री . शरद पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष आणि भारतीय जनता पक्ष यांची हातमिळवणी होऊ शकते का ? त्यासाठी श्री. पवार प्रयत्नशील आहेत का ? खरे तर ही शक्यता आणि वस्तुस्थिती यापूर्वी राज्यातील जनतेने पाहिली होती . एकीकडे महाविकास आघाडी स्थापन करत असताना श्री. शरद पवार यांनी पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती . सकृतदर्शनी ही भेट शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात होती . मात्र ती केवळ आणि केवळ शेतकऱ्यांच्या संदर्भातच होती हे मान्य करणे अवघड आहे . शेतकरी , त्यांचे कर्ज , मदत , आपत्ती काळातून शेतकऱ्यांना सोडविण्यासाठी केंद्र सरकारने शेतकऱ्यांना मदत करावी अशी कारणे श्री. शरद पवार यांनी दाखवली होती . खरे तर राज्यात सत्ता स्थापनेपूर्वी अशी मदत केंद्र सरकार कोणाच्या माध्यमातून ,कशी करणार होते आणि नैसर्गिक आपत्तीवर मदत करण्यासाठी यंत्रणा एक पद्धत आहे . त्यानुसार काम केले जाते , श्री. शरद पवार यांना माहिती नाही असे नाही . पण शेतकऱ्यांच्या सामाजिक कार्याचा , कारणाचा मुखवटा धारण करून त्यांनी सत्ताकारणाची गणिते सोडवण्याचा प्रयत्न नक्कीच केला असणार . कितीही नाही म्हटले तरी श्री. फडणीसांच्या काळातला भूतकाळ पाहता श्री .देवेंद्र फडणवीस यांची वजाबाकी , सौ सुप्रिया सुळे म्हणजे स्वतःच्या मुलीचा हातचा धरून बेरीज , भाजप – सेना युतीचा भागाकार तर सेना काँग्रेसमध्ये गुणाकार यासह ते या बैठकीला गेले असावेत . पण भाजपसह मात्र श्री. देवेंद्र फडणवीस यांच्याशिवाय सत्तेचा महत्तम साधारण विभाजक म्हणजे मसावी त्यांना या भेटीत काढता आला नाही . काँग्रेस – शिवसेनेला सोबत घेऊन सत्ता स्थापनेचा लसावी त्यांना प्रत्यक्षात उतरवावा लागला . आता श्री . मोदी आणि श्री. शहा यांच्याबरोबर श्री . पवार काय बोलले हे श्री . शहा आणि श्री . ठाकरे यांच्या बंद खोलीत झालेल्या चर्चे सारखेच आहे .
सत्तेच्या केंद्रस्थानी
दुसरी शक्यता श्री . शरद पवार यांना केवळ राज्याच्याच नव्हे तर देशाच्याही सत्ताकारणांमध्ये किंवा राजकारणामध्ये केंद्रस्थानी राहायचे आहे . भारतीय जनता पक्षाबरोबर जाऊन किंवा काँग्रेसमध्ये सहभागी होऊन ते शक्य नाही ,हे त्यांना नक्कीच माहिती आहे . यासाठी तिसऱ्या आघाडीचा प्रयोग , नेहमीप्रमाणे राष्ट्रपती पदाचे उमेदवार हे विषय सुरू झाले आहेत . काही असले तरी श्री . शरद पवार यांच्या सत्ताकारणाला आणि राजकारणाला मानलेच पाहिजे . त्यांच्या राजकीय कारकिर्दी एवढे वय असलेल्या ; देशातल्या सगळ्या पक्षातल्या , सगळ्या नेत्यांमध्ये ही राज्यात , केंद्रात सत्ता स्थापनेची ईच्छा , राजकारणात केंद्रस्थानी राहण्याची अनावर ओढ ,त्यासाठी शारीरिक व्याधी – मात करून लढण्याची निवृत्ती श्री. शरद पवार यांच्याकडे आहे .ती इतर कोणाकडेच नाही हे सिद्ध होते . श्री. पवार 24 सालची निवडणूक , याशिवाय उत्तर प्रदेशात होणारी निवडणूक , राष्ट्रपतीपदाची निवडणूक यासाठी समीकरणे जुळवण्याची धडपड करत आहेत . तिसरी आघाडी होईल न होईल यासाठी डावपेच आखत आहेत . त्यांना यश येईल न येईल .यश आले तर तो एक त्यांच्या धडपडीचा महत्त्वाचा इतिहास असेल .मात्र राजकारणाच्या केंद्रस्थ राहण्याची एक शक्यता यात दिसून येते .
राज्यात तिसरी आघाडी
तिसरी शक्यता जी आहे ती शक्यता तिसऱ्या आघाडीची आहे . काँग्रेसला सोबत घेऊन तिसरी आघाडी होऊ शकत नाही. हे देश पातळी वरील राजकारण करणाऱ्या श्री . पवार यांना नक्कीच माहिती आहे . मात्र भारतीय जनता पक्ष , काँग्रेस या दोन आणि उरलेल्या समविचारी पक्षांची तिसरी आघाडी करण्याचा प्रयत्न श्री . पवार नक्कीच करत असतील . भाजपशी श्री . पवार यांचा जुळवून घेण्याचा प्रयत्न कदाचित असू शकतो . काँग्रेसने सध्या आपल्याशी जुळवून घ्यावे असे त्यांना वाटत असावे . आणि इतर प्रादेशिक पक्षांची सहज जुळेल हा त्यांचा अंदाज आहे . खरे तर काँग्रेस पक्षाने त्यांनी केलेला दगाफटका सोसलेला आहे . काँग्रेसच्या दृष्टीने तो दगाफटका असू शकतो तर राष्ट्रवादी आणि श्री . शरद पवार यांच्या दृष्टीने ती महत्त्वाकांक्षा असू शकते . अर्थात कोणी काही म्हणो त्याचा फटका काँग्रेसला बसला हे काँग्रेसनेही मान्य केले पाहिजे . भारतीय जनता पक्ष त्यांच्या आहारी जाणार नाही हे नक्की आहे . श्री. देवेंद्र फडणवीस यांची दुसऱ्यांदा स्थापन झालेली काही तासांची सत्ता ; भाजपने श्री . शरद पवार अथवा पवार यांच्या राष्ट्रवादीबरोबर स्थापन केली नव्हती , तर ती श्री. अजित पवार यांच्याबरोबर स्थापन केली होती . सहाजिकच भारतीय जनता पक्ष हा राष्ट्रवादीला ओळखून आहे हे नक्की .
राष्ट्रवादी शिवसेना एका तागड्यात
शिवसेना हा तिसरा पक्ष श्री
. शरद पवार यांच्या दृष्टीने त्यांच्या पक्षाचा सारखाच लाभार्थी पक्ष आहे . राष्ट्रीय पक्षाचे कोंदण असल्या शिवाय हे पक्ष चमकू शकत नाहीत. त्यामुळे राष्ट्रीय पातळीवर शिवसेनेचा श्री . शरद पवार यांना फारसा उपयोग नाही . पण राज्यात त्यांना शिवसेने शिवाय सध्या तरी तरणोपाय नाही . सहाजिकच देशात तिसऱ्या आघाडीचा प्रयोग होईल न होईल पण महाराष्ट्रात श्री . शरद पवार तिसऱ्या आघाडीचा प्रयोग नक्कीच करतील असे वाटते . राष्ट्रवादी व शिवसेना ही एक आघाडी म्हणजे तिसरी आघाडी असेल भाजप आणि काँग्रेस स्वबळावर निवडणुका लढवण्याच्या मन:स्थितीत असतील . सहाजिकच जागावाटप हा या सगळ्याचा कळीचा मुद्दा असेल आणि निवडणुकीनंतर पुन्हा वेगळी महायुती पाहायला मिळाली तर आश्चर्य वाटण्याचे कारण नाही , नसेल . मात्र देशपातळीवर तिसऱ्या आघाडीची तयारी करावी तेव्हा ती राज्यात जमते आणि महापालिका , जिल्हा परिषद , नगरपालिका यामध्ये सत्ता मिळू शकते . वाघाच्या शिकारीची तयारी केली म्हणजे सशाची शिकार नक्कीच मिळते , सध्या वाघाचा ससा कसा, कोणी केला हे श्री . शरद पवार नक्कीच जाणतात. नाही का.!
मधुसूदन पतकी
१७ जुलै २०२१