कमी कालावधीत रोख पैसे मिळवून देणारे पीक म्हणून शेतकरी मुगाचे पीक घेतले जाते. कोरडवाहू पट्ट्यात आंतरपीक म्हणूनही मुगाची लागवड केली जाते. मात्र, यंदाच्या हंगामात लागवड झालेल्या मुगाचे संपुर्ण पीक किड आणि रोगांमुळे शेतकऱ्यांच्या हातातून गेले आहे. त्यामुळे लागवडीसाठी कलेला खर्चसुद्धा निघण्याची शक्यता नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे.
अधिक क्षेत्रावरील पीक रोग आणि किडींमुळे फस्त झाले आहे. सध्या मुगाचे पीक उभे दिसत असले तरी एकाही झाडावर शेंगा लागलेल्या नाहीत. मुगावर लागवडीनंतर साधारणतः महिनाभरातच पाने अकडून पिकाची वाढ थांबली. यामुळे माण तालुक्यातील विरळी, मार्डी, शिखर शिंगणापूर,वावहिरे ,गोंदवले ,पळशी , बिदाल ,तोंडले, मलवडी ,आंधळी टाकेवाडी या भागातील शेतकरी अडचणीत सापडलेला आहे.
काही शेतकऱ्यांनी विविध प्रकारच्या औषधांची फवारणी करीत पीक वाचवण्याचा प्रयत्न केला. परंतू हे प्रयत्न अपयशी ठरले आहेत. सध्या उभे दिसत असलेल्या पिकात शेंगाच लागलेल्या नाहीत. ज्या झाडांवर शेंगा लागल्या त्या आठवडाभरापासून सुरु असलेल्या पावसाने खराब केल्या. यामुळे यंदाच्या हंगामात संपूर्ण मुगाचे पीक शंभर टक्के शेतकऱ्यांच्या हातातून गेले आहे
कृषी विभागाच्या योजना सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोचत नाहीत अधिकारी शेतकऱ्यावर बांधावर कधी प्रत्यक्ष येऊन पाहणी करत नाहीत. तर बाजार समितीचे संचालक शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळावा यासाठी प्रयत्न करत नसल्याने शेतकरी माण बाजार समितीच्या संचालकावर व कृषी विभागावर नाराज आहे.