कोळकी : राज्यातील इयत्ता पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेने घेतला आहे. या परीक्षांसाठी ऑनलाईन अर्ज व परीक्षा फी भरण्यासाठी आता दि. 31 जानेवारीपर्यंत शाळांना मुदत वाढ देण्यात आली आहे. ही परीक्षा 20 फेब्रुवारी रोजी होणार होती.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून शाळा अचानक बंद कराव्य लागल्यामुळे अनेक शाळांना या शिष्यवृत्ती परीक्षेसाठीची आवश्यक प्रक्रिया पूर्ण करता आली नाही. त्यामुळे 20 फेब्रुवारीला होणारी ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय शिक्षण परिषदेकडून 14 जानेवारी रोजी घेण्यात आला आहे. या परीक्षांची नवीन तारीख नंतर जाहीर करण्यात येणार आहे. दरम्यान राज्यातील शाळा सुरू ठेवण्यावरून राज्य सरकार मध्ये मतभेद असल्याचे चित्र दिसत आहे. ज्या ठिकाणी कोरोना चा प्रादुर्भाव नाही अशा ठिकाणी शाळा सुरू करण्यास हरकत नाही असे अनेक मंत्र्यांचे मत आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यांनी तशी भूमिका देखील मांडली असल्याचे समजते.