(पाटण पंचायत समिती मासिक सभा)
पाटण प्रतिनिधी : 1967 चा भूकंप आणि आत्ताची आपत्ती पाहता संकटाची मालिका ही आमच्या पाचवीलाच पुजली आहे. पाटण तालुक्यात मुसळधार अतिवृष्टीने भूस्खलन होवून मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली. बाधितांसाठी मदत आणखीही येईल मात्र जे नुकसान झाले ते न भरून येणारे असल्याची खंत व्यक्त करत या आपत्तीत राजकारण न करता सर्वजण एकत्रित आले. महसूल, पोलीस, पंचायत समिती, एनडीआरएफ टीम व सामाजिक घटकांनी चांगल्या प्रकारे काम केले. या सर्वांच्या अभिनंदनाचा ठराव सभापती राजाभाऊ शेलार यांनी मासिक सभेत मांडला.
येथील पंचायत समितीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात सभापती राजाभाऊ शेलार यांच्या अध्यक्षतेखाली मासिक सभा पार पडली. यावेळी उपसभापती प्रतापराव देसाई, गटविकास अधिकारी मीना साळुंखे, सहाय्यक गटविकास अधिकारी व्ही. विभूते यांची प्रमुख उपस्थिती होती. दरम्यान, पाटण तालुक्यात अतिवृष्टीकाळात समाजातील ज्या ज्या घटकांनी, अधिकारी, कर्मचारी, संघटना, संस्था, पत्रकार यांनी चांगले काम केले त्यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव घेण्यात आला.
तालुक्यात अतिवृष्टीने जीवित हानीबरोबरच वित्तहानीही मोठी झाली आहे. त्यामुळे तालुक्यात जी जी गावे डोंगरालगत पायथ्याशी आहेत त्यांचा सर्वे करून कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी सदस्य बबनराव कांबळे यांनी केली. तालुक्यात आरोग्य विभागात अनेक पदे रिक्त आहेत. तालुक्यातील 225 गावचे पाणी नमुने तपासणीसाठी पाठविले होते त्यातील दोन नमुने दुषित आले आहेत. अतिवृष्टीने विस्थापित झालेल्या 2 हजार 121 लोकांना लसीकरण केले आहे. सध्या 147 ऍक्टिव केसेस असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली. उपकेंद्रांमध्ये डॉक्टर राहत नसल्याची तक्रार सदस्य बबनराव कांबळे यांनी केली. तर मल्हारपेठ परिसरातील खाजगी डॉक्टर रात्री-अपरात्री रुग्णांना सेवा देत नाहीत. कोरोना काळात खाजगी डॉक्टरांकडून रुग्णांची हेळसांड केली जात असल्याचे सुरेश पानस्कर यांनी सांगितले. अतिवृष्टीने तालुक्यात 207 जनावरे मृत्यूमुखी पडली असून त्यांचे पंचनामे करण्यात आल्याचे पशुसंवर्धन अधिकाऱ्यांनी सांगितले.
कृषी विभागाचा आढावा देताना अतिवृष्टीमुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले असून पंचनामेही करण्यात आले आहेत. 325 गावातील 30 हजार शेतकऱ्यांचे मिळून 2 हजार 700 हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. भरपाईची रक्कम मिळताच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जाईल. अतिवृष्टीत मयत झालेल्या 34 पैकी 25 लोकांना गोपीनाथ मुंडे योजनेतून आर्थिक मदत दिली जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
76 ग्रामपंचायती अतंर्गत अतिवृष्टीमुळे पडझड झाली असून त्याचा अहवाल वरिष्ठांकडे पाठविला असल्याचे ग्रामपंचायत विभागाचे वाघ यांनी सांगितले. मल्हारपेठ ग्रामपंचायतीने गाळे भाड्यात एक हजाराची वाढ केली असून ती अन्यायकारक आहे. कोरोनाकाळातील भाडे माफ करावे. त्याचबरोबर शेडगेवाडी ग्रामपंचायतीमार्फत बिहार पॅटर्न योजनेद्वारे 200 वृक्षांची लागवड केल्याचे कागदोपत्री नमूद आहे. मात्र प्रत्यक्षात वृक्ष लागवड केलीच नाही. सोनाईचीवाडी ग्रामपंचायतीतही खर्चात अपहार झाला असून या दोन्ही ग्रामपंचायतींच्या चौकशीची मागणी सुरेश पानस्कर यांनी केली. याबाबत सखोल चौकशी केली जाईल, असे गटविकास अधिकारी मीना साळुंखे यांनी सांगितले. तळमावले ग्रामपंचायतीचे 48 गाळे असून प्रतिमहा प्रत्येक गाळ्यांचे पावणेतीन हजार रुपये भाडे घेतले जातात. मात्र ग्रामपंचायतीला केळ सहाशे रुपये भाडे भरले जात असून या अफहाराची चौकशी करावी, अशी मागणी सीमा मोरे यांनी लावून धरली.
पाणी पुरवठा विभागाची माहिती देताना तालुक्यात अतिवृष्टीमुळे 291 पाणी योजनेचे नुकसान झाले आहे. त्यातील केवळ 103 योजनेचे पंचनामे प्राप्त असून ते वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविले असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. ज्या ज्या ठिकाणी दरडी कोसळून पाणी योजना बाधित झाल्या आहेत, पाईपा वाहून गेल्या आहेत त्या त्याठिकाणी आठ दिवसात पाणी योजना पूर्ववत करण्याच्या सूचना सभापती राजाभाऊ शेलार यांनी अधिकाऱ्यांना केल्या. झाकडे गावात पाण्यातून आळ्या येत असून अनेकजण आजारी पडले आहेत. नाटोशी पाणी योजनाही अपूर्णावस्थेत असल्याची तक्रार सदस्या निर्मला देसाई यांनी केली. बांबवडे गावात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर असून तेथे टॅंकरने पाणी पुरवठा करण्याची मागणी उज्वला लोहार यांनी केली.
शिक्षण विभागाचा आढावा देताना तालुक्यात अतिवृष्टीने 44 शाळांचे एकूण 1 कोटी 15 लाख रुपयांचे नुकसान झाले असून 3 विद्यार्थी मयत झाले आहेत. 45 संगणक व 54 ऍन्ड्राईड टिव्ही प्राप्त झाले असून त्याचे वाटपही करण्यात आले आहे. 17 तारखेनंतर शाळा सुरू होणार आहेत. 900 शिक्षकांची कोविडसाठी ड्युटी लावली असल्याची माहिती शिक्षणाधिकारी बोरकर मॅडम यांनी दिली. तालुक्यातील प्रत्येक शाळा व अंगणवाडी इमारतीचे बांधकाम विभागाकडून स्ट्रक्चरल ऑडीट करावे आणि नुकसानग्रस्त शाळांना जास्तीत जास्त मदत मिळावी, अशी मागणी सुरेश पानस्कर यांनी केली. भविष्यातील धोका टाळायचा असेल तर प्रत्येक शाळेचे स्ट्रक्चरल ऑडीट झालेच पाहिजे असे पंजाबराव देसाई यांनी सभागृहाला सांगितले.
तालुक्यातील 17 अंगणवाड्यांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे. तर मोरगिरी येथील अंगणवाडी पूर्णत: पडली आहे. त्याचे अहवाल वरिष्ठांना पाठविले आहेत. अंगणवाडीतील 57 जागांसाठी रिक्त जागांची भरती प्रक्रिया सुरू होती. त्यातील 25 जागांसाठी अर्ज प्राप्त झाले होते. मात्र सध्या ही भरती प्रक्रिया स्थगीत करण्याचे आदेश आल्याची माहिती व्ही. बी. विभूते यांनी दिली. तालुक्या 229 अंगणवाड्यांमध्ये शौचालय नाहीत व 437 अंगणवाडीत वीज नसल्याचे सुरेश पानस्कर यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.
सभापती राजाभाऊ शेलार यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. उपसभापती प्रतापराव देसाई यांनी आभार मानले.