उंब्रज-प्रतिनिधी :
उंब्रज शहरापासून हाकेच्या अंतरावर व तारळी नदीच्या काठावर सुमारे हजार एक लोकसंख्येचं वसवलेलं छोटंसं गाव म्हणजे भोसलेवाडी , आता इथे वसवलेलं असा मुद्दाम उल्लेख केला आहे कारण या गावाचे इनामपत्र , पहिला वाडा जो बांधला गेला त्याचे दस्ताऐवज आणि दस्तुरखुद्द सातारा गादीचे छत्रपती , छ.शाहू महाराज यांनी गणोजीराजे भोसले यांना इनाम म्हणून दिलेले हे गाव असा पूर्णपणे कागदोपत्री ऐतिहासिक वारसा सांगणारं हे गाव .
आजचे भोसलेवाडीचे इनामपत्र हे शिवराज्याभिषेक शके 71 श्रावण बहुल तृतीया रक्तक्षी नामसंवत्सरे या दिवशी म्हणजेच शालिवाहन शके 1666 आणि इ.स.1744 मध्ये झाले तो दिवस हा एकनाथषष्ठीचा होता . याच दिवशी श्रीमंत गणोजीराजे भोसले यांचे गुरू सद्गुरू प्रहब्रह्म गोपालनाथ महाराज यांच्या आसनाची स्थापना , श्रीमंत गणोजीराजे भोसले यांच्या वाड्याचा पायाभरणी समारंभ व जमिनीचे इनामपत्र असा त्रिवेणी समारंभ पार पडला , या त्रिवेणी समारंभाच्या पुण्यस्मरणार्थ एकनाथषष्ठी चा उत्सव सुरू झाला.आपण आपल्या घरी एखाद्या व्यक्तीचा वाढदिवस साजरा करतो अगदी तसाच आज भोसलेवाडी या संपूर्ण गावाचा 279 वा वाढदिवस . म्हणजेच गावची यात्रा पण बाकीच्या यात्रांसारखे इथे नाच-गाणे , तमाशा , कोंबड्या-बकऱ्याचे मटण , भावकी-भावकितील वाद याप्रकारे साजरा न होता , भूतदया सांगणाऱ्या नाथांच्या परंपरेने भजन ,किर्तन , महाप्रसाद , भंडारा यापद्धतीने साजरा केला जातो.
या उत्सवातील सर्वांत विशेषनीय गोष्ट म्हणजे नाथांचा वांग-भाकरी चा महाप्रसाद , सुमारे 700-800 किलो वांगी आणि 500-600 किलोच्या ज्वारीच्या पिठाच्या भाकरी यापासून हा प्रसाद बनवला जातो , गावातील प्रत्येक घरातून भाकरी बनवून त्या ट्रॅक्टर ( ट्रॉली ) तून गोळा करून मंदिरात आणल्या जातात , मंदिराशेजारी भल्या मोठ्या हांड्यात वांगी स्वच्छ धुवून व चिरून , त्यांना चटणी , तेल , मीठ याची फोडणी देऊन , चुलीला रखरखीत जाळ लावून , कालवणाला खळखळीत उकळी दिली जाते , अशा या अलौकिक अन वेगळ्या धाटणीचा प्रसाद चाखण्यासाठी उंब्रज पंचक्रोशी व कराड तालुक्यातून हजारो भाविक ” तुमच्या संग मला इंवद्या की रं , वांग न भाकरी खावंद्या की रं ” म्हणत या वांग-भाकरी-कांद्याचा भक्तिभावाने आस्वाद घेतात , कितीही लोकं आली तरी इथला महाप्रसाद आजपर्यंत कधीही कमी पडला नाही आणि कोणी उपाशी पोटी गेला नाही , डोळे , मन आणि उदर तृप्त करणारा हा सोहळा म्हणजे गोपालनाथ महाराजांचा कृपाशीर्वादच म्हणावा लागेल.
तीन दिवस चालणाऱ्या या उत्सवाच्या पहिल्या दिवशी अभिषेक व महापूजा , ध्वजारोहण , नाथ चरित्र कीर्तन व पुष्पार्पण पहिली आरती , संगीत-भजनाचा सुश्राव्य कार्यक्रम , सायंकाळी मंदिर पालखी प्रदक्षिणा , खीर-वांग्याचा प्रसाद व एकतारी भजन. दुसऱ्या दिवशी अभिषेक , नाथ लिलाविलास ग्रंथाचे पारायण , भजन-संगीत , दही-हंडीचा खेळ , नाथांच्या पादुकांची ग्रामप्रदक्षिणा व वांग-भाकरी चा महाप्रसाद , तिसऱ्या दिवशी महाआरती , महाप्रसाद व मानाच्या गुळ-पेढ्याच्या प्रसादाने सोहळ्याची भक्तिमय वातावरणात सांगता होते.






















