मसूर:रिसवड ता. कराड येथे गत एक महिन्यापासून भटक्या श्वानांनी हल्ला करून चार रेडके ठार तर एक रेडूक जखमी केले,तसेच पोल्ट्री फॉर्ममधील 16 कोंबडया व 2 बदके फस्त करून शेतकऱ्यांचे हजारो रूपयांचे नुकसान झाले आहे. या घटनेमुळे गावातील शेतकरीवर्गात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. तरी शासनाने या भटक्या श्वानांचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांतून केली जात आहे.
गत महिन्यापासून पांडूरंग रघुनाथ इंगवले,संपत गणपती इंगवले, सतीश दिनकर इगवले,अविनाश इंगवले या शेतकऱ्यांची रेडके शेतातील गोठयात जावून हल्ला करुन ठार केली आहेत.तर जयवंत दादा इंगवले यांचे रेडकू हल्ला करुन जखमी केले आहे.तसेच राजाराम दादा इंगवले यांच्या 16 कोंबडया, 2 बदके श्वानांनी हल्ला करुन फस्त केली आहेत. त्यामुळे शेतकरी वर्ग भयभीत झाला आहे.
सुमारे 10 ते 12 भटक्या श्वानांचे टोळके आहे हे टोळके शेतामध्ये दिवसासुध्दा एकटा माणूस दिसला तर त्याच्यावर हल्ला करत आहेत.त्यामुळे शेतात जाण्यासाठी शेतकरी घाबरत आहेत. तर महिला वर्ग श्वानांच्या धास्तीने शेतात जायला धजवत नाहीत.शेतकऱ्यांची रोजी रोटी शेतीवर अवलंबून असते.तसेच खरीप पिकांची आंतरमशागतीची कामे करण्यासाठी शेतात गेल्याशिवाय गत्यंतर नाही.परंतु या श्वानांनी रेडके,माणसे यांच्यावर हल्ला करण्याचा सपाटा लावल्याने शेतकरी व महिला शेतात जाण्यास घाबरत आहेत तरी संबंधीत विभागाने पहाणी करुन श्वानांचा बंदोबस्त करावा अशी मागणी जोर धरत आहे.
गत महिन्यापासून गावातील शेतकरी व महिला श्वानांच्या भितीच्या छायेत वावरत आहेत.त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतात जायचे का श्वानांच्या भितीने घरातच बसायचे याचा विचार करुन शासनाने तातडीने बंदोबस्त करावा अन्यथा ग्रामस्थांच्या उद्रेकाला सामोरे जावे लागेल असा इशारा माजी सरपंच सतीश इंगवले यानी दिला आहे.