नवरात्रोत्सवापासून परवानगी द्या:हर्षवर्धन पाटील
महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी ( इंदापूर): शहाजीराजे भोसले
नागरिकांची जनजनजीवन , बाजारपेठा सध्या पूर्ववतपणे सुरु झालेल्या आहेत . सध्या शासनानेही बहुतेक सर्व व्यवसाय सुरू करण्यास नियम व अटी घालून परवानगी दिलेली आहे . सर्व व्यवहार सुरळीतपणे चालू असताना गावोगावच्या मंडप व्यावसायिकांवरच बंदी का ? आणखी किती दिवस मंडप व्यवसाय बंद ठेवणार ? असा परखड सवाल भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी बुधवारी ( दि.३० ) उपस्थित केला.
शासनाने नवरात्रोत्सवापासून मंडप व्यवसायिकांना आपला व्यवसाय सुरू करण्यास नियम व अटी घालून परवानगी द्यावी , अशी मागणी यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी केली . मंडप व्यवसायिकांना तातडीने मंडप व्यवसाय सुरू करण्यास परवानगी द्यावी , या मागणीचे पत्र जिल्हाधिकारी व इतर संबंधित अधिकाऱ्यांना आजच पाठविण्यात येईल ,असे पाटील यांनी सांगितले .
शहाजीनगर (ता.इंदापूर) येथे नीरा भीमा सहकारी साखर कारखान्यावरती बुधवारी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची इंदापूर तालुका मंडप व्यावसायिक संघटनेचे अध्यक्ष रविंद्र कासार , उपाध्यक्ष टिंकू ढवळकर , बंडू मुलाणी , चिमा ढोले , गणेश भिंगारदिवे आदी पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली.यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन त्यांना सादर केले . त्यानंतर हर्षवर्धन पाटील यांनी संघटनेच्या शिष्टमंडळाबरोबर चर्चा केली .
गेली ७ -८ महिन्यांपासून मंडप व्यवसायिक हे कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे व्यवसाय सुरू करण्यास परवानगी नसल्याने आर्थिक अडचणीत सापडले आहेत , सध्या त्यांच्यापुढे कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झालेला आहे . गावोगावच्या मंडप व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आल्याचे या पदाधिकाऱ्यांनी यावेळी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे .