महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी :बिदाल
सध्या कोरोनाचा संसर्ग राज्याच्या सर्वच भागात सुरू आहे. कोरोनामुळे बहुतांशी शेतकर्यांचा रोजगार बुडाला आहे अशा परिस्थितीत ग्रामीण भागात शेतीला जोडधंदा असलेला दुधाचा व्यवसायही अडचणीत सापडला आहे. दुधाला मागणी असूनही योग्य दर मिळत नसल्याने शेतकर्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. दुभत्या जनावरांचा चारा आणि पशुखाद्याचा वाढता खर्च भागवताना शेतकर्यांना कसरत करावी लागत आहे.
राज्यात सातारा जिल्हा दूध उत्पादनात अग्रेसर मानला जातो. परंतु चार महिन्यांपासून कोरोनामुळे विविध संकटांना तोंड देत येथील शेतकरी पशुपालन करताना मेटाकुटीस आले आहेत. दुधाच्या समस्येने शेतकर्यांच्या संकटात आणखी भर पडली आहे.
माण तालुक्यातील गोंदवले ,मार्डी आंधळी, बिदाल, पळशी ,मलवडी राणंद या भागात दुधाचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे येथील शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत. परंतु गेल्या चार महिन्यांपासून शेतकर्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. गेल्या तीन ते चार महिन्यांपासून दूध उत्पादक शेतकर्यांना कोरोनाची झळ बसत आहे. सरकारने दूध उत्पादकांचे अतिरिक्त दूध खरेदी करण्याचे आश्वासन दिले असले तरी त्याचा थेट फायदा गावातील दूध उत्पादकापर्यंत पोहचत नाही.
सहकारी खासगी दूध संघ या सगळ्या परिस्थितीचा गैरफायदा घेत असल्याचे दिसून येते. अनेक खासगी दूध संघ आहेत. परंतु या दूध संघाकडून शेतकर्यांच्या दूधाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी भरडला जात आहे. पूर्वी गायीच्या दुधाचा 28 ते 30 रुपयांपर्यंत दर होता परंतु तो दर आता अठरा ते वीस रुपयांवर आला आहे.
माण तालुक्यात दुधाच्या दरासाठी रस्त्यावर कोण उतरणार ?
सध्या राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे आणि भाजप पक्ष हा विरोधी पक्ष म्हणून कार्यरत आहे मात्र मान तालुक्यात दुधाच्या दरासाठी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते रस्त्यावर उतरणार का असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत.राष्ट्रीय समाज पक्ष व महायुतीतील घटक पक्षांना सोबत घेऊन भाजपाचे आमदार जयकुमार गोरे पुढील काळात निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे