16 चोरीच्या मोटार सायकल जप्त
कराड : आंतरराज्य मोटार सायकल चोरट्यास अटक करण्यात कराड शहर पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेला यश आले आहे. त्याच्याकडून एकुण 16 चोरीच्या मोटार सायकल जप्त करण्यात आल्या.
कराड शहर पोलीस ठाणे येथीन मिळालेली माहीती अशी, कराड शहर पोलीस ठाणे हद्दीत मोटार सायकल चोरीने डोके वर काढले होते. मोटार सायकल चोरीला आळा घालण्यासाठी कराड शहर पोलीस ठाणे हद्दीत होणाऱ्या मोटार सायकल चोरीच्या गुन्ह्यांना प्रतिबंध होवून ते उघड करण्याकरीता गुन्हे प्रकटीकरण शाखेकडून विशेष पथक तयार करणेत आलेले होते. सदरचे विशेष पथक नमुद अनुषंगाने कराड शहर पो.ठाणे हद्दीत व परिसरात मोटार सायकल चोरांचा शोध घेत असताना गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अंमलदार संतोष सपाटे व नितीन येळवे हे कराड शहरात पेट्रोलिंग करत असताना त्यांना एक गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली त्यामाहितीवरून, एक संशयीत इसम कराड बसस्थानक परिसरातून ताब्यात घेतला. त्यास त्याचे नाव गाव विचारले असता प्रथम त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यास गुन्हे प्रकटीकरण शाखेत आणून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि अमित बाबर यांनी कौलशल्यपुर्ण तपास केला असता त्याने एकुण 16 मोटार सायकल चोरी केल्याचे कबुल केले. त्या त्याच्याकडून जप्त करण्यत आलेल्या आहेत. आरोपी याने कराड शहरातून 7, विटा जिल्हा सांगली येथून 3, कासा जिल्हा पालघर येथून 1 तसेच अहमदाबाद राज्य गुजरात येथून 05 अशा एकुण 5,58,000/- रुपये किंमतीच्या 16 मोटार सायकल चोरल्याचे निष्पन्न झालेले आहे.
नमुद गुन्ह्याच्या तपासामध्ये नमुद आरोपीत हा एस.टी.बसने वेगवेगळया शहरात जावून बसस्थानक परिसरात लोकांनी पार्क केलेल्या स्प्लेंडर, एचफ डिलक्स व शाईन मोटार सायकल अशा गाड्या टार्गेट करून त्यांच्याकडील मास्टर की ने हॅण्डल लॉक काढून चालु करत होता. गाडीची नंबर प्लेट काढून ग्राहक शोधून, कोरोना मुळे पेपर ट्रान्स्फर होण्यास वेळ लागत आहे, असे सांगून गाड्याची विक्री करत होता. गाड्या चोरून विकून मिळालेल्या पैशातून मौजमजा करत होता.
सदरची कामगिरी मा.पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल सोा, मा.अपर पोलीस अधीक्षक अजित बोऱ्हाडे सोा, मा.उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. रणजीत पाटील साहेब व कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी.आर.पाटील यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे प्रमुख अमित बाबर सहा. पोलीस निरीक्षक कराड शहर पो.ठाणे, पोउपनि अशोक भापकर सफौ संतोष सपाटे, सतीश जाधव, पोलीस हवालदार जयसिंग राजगे, नितीन येळवे, मनोज शिंदे पोलीस नाईक संजय जाधव, सचिन साळुंखे, संदीप कुंभार, मारुती लाटणे, प्रफुल्ल गाडे, आनंदा जाधव, संग्राम पाटील, सुजीत दाभाडे यांनी केलेली आहे.
पोलीसांकडून आवाहन
नमुद गुन्ह्यातील आरोपीतांकडून ज्या ज्या लोकांनी मोटार सायकल खरेदी केल्या आहेत. त्यांना भादविसक 411 प्रमाणे चोरीची मालमत्ता खरेदी केल्या प्रकरणी आरोपी करण्यात आलेले आहे. तरी कोणी इसम बिगर नंबर प्लेट विनाकागदपत्राची मोटार सायकल विक्री करण्यास आल्यास अशा मोटार सायकल कोणी खरेदी करु नये असे कोणी व्यक्ती आपलेकडे आल्यास आपण नजीकच्या पोलीस स्टेशनला कळवावे. मोटार सायकल खरेदी केल्यास जेलची हवा खावी लागणार.






















