दहिवडी : ता.२२
माण तालुक्यातील पांगरी येथे दहिवडी फलटण रोडवर ट्रॅक्टर ट्रॉली आणि बोलेरोचा भीषण अपघात झाल्याची दुर्दैवी घटना घडली. घटनास्थळावरून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार या अपघातात बोलेरोमध्ये असलेल्या सहा जणांपैकी दोन जण ठार झाल्याची तर चार जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार वावरहिरे येथील मोहन साहेबराव पांढरे यांचा नंबरप्लेट आणि कोणत्याही प्रकारचे रेडियम नसलेली आणि विहिरीच्या यारीचे साहित्य असलेली ट्रॉली जोडलेला ट्रॅक्टर क्र.एम.एच.११ (५०७२- मालकाने सांगितलेल्या नंबरनुसार) हा ट्रॅक्टर दहिवडीकडे तोंड करुन उभा होता. त्याचवेळी फलटणकडून दहिवडीकडे जाणारी भिकवडी बु!, ता. खानापुर,जि.सांगली येथील क्र.एम एच ११ बी एच १५३९ ही बंद लाईट असलेल्या ट्रॉलीला मागून धडकली. यामध्ये बोलेरो गाडीचे मोठे नुकसान झाले. बोलेरोच्या धडकेने ट्रॅक्टरची ट्रॉली ही निखळली होती.
हा अपघात झाल्यानंतर तात्काळ जेसीबी पाचारण करत बोलेरो आणि ट्रॉली वेगळी करण्यात आली, तर ट्रॅक्टर ट्रॉलीपासून वेगळा करुन अंधारात उभा केला होता.
या भीषण अपघाताची महिती मिळाल्यानंतर बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. अपघातादरम्यान दोन्ही बाजूची वाहतूक बराच वेळ खोळंबून होती. दहिवडी पोलिसांनी अपघातग्रस्तांना रुग्णवाहिकेतून रुग्णालयात पाठवल्यानंतर वाहतूक सुरळीत केली.