राजेंद्र यादव यांचा सणसणीत इशारा
कराड : कराड विमानतळाबाबतच्या जिल्हा प्रशासनाने घालून दिलेल्या अटी व नियमावली जाचक आहेत. त्यामुळे शहर व परिसराचे नुकसान आहे, हे टाळण्यासाठी या अटींविरोधात जनआंदोलन उभारणार असल्याचा इशारा नगरपालिकेचे गटनेते राजेंद्रसिंह यादव यांनी आज दिला.
आज पत्रकारांसाठी दिवाळी फराळ कार्यक्रमाचे आयोजन त्यांच्या वतीने करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी नगरसेवक हणमंत पवार, गुंड्याभाऊ वाटेगावकर, नगरसेविका स्मिता हुलवान, सुप्रिया खराडे, आशा मुळे, प्रियांका यादव, गजेंद्र कांबळे, किरण पाटील, बाळासाहेब यादव आदी उपस्थित होते.
राजेंद्र यादव म्हणाले, कराड विमानतळ परिसरात 20 किलोमीटर पर्यंत बांधकाम उभारण्यास शासनाने निर्बंध लावले आहेत. त्यामुळे त्या परिसरात बांधकाम करण्यापूर्वी स्थानिक प्रशासनाचा ना हरकत दाखला घेणे बंधनकारक असणार आहे. आणि या अटी जाचक व खूप अडचणीच्याही आहेत. शहराच्या विकासावर त्याचा परिणाम होणार आहे, याबाबत प्रशासनाशी बोलणार आहे. त्यानंतर सात दिवसात याबाबत योग्य तो निर्णय न झाल्यास तीव्र जनआंदोलन उभारणार असल्याचा इशारा जनशक्ती चे नेते राजेंद्र यादव यांनी दिला आहे.






















