कराड : येथील बुधवार पेठेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर शाळा क्रमांक दहाच्या नजीक संरक्षक भिंतीसाठी काढलेल्या खड्ड्यात एका चार वर्षांच्या मुलाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मुलाच्या कुटुंबीयांनी आक्रोश व्यक्त करीत गोंधळ घातला आहे.
पुतळा परिसरातील घिसाडी समाजातील कुटुंबियातील हा चार वर्षाचा मुलगा असून दस्तुरखुद्द त्या मुलाच्या पित्यानेच संबंधित खड्यात साठलेल्या पाण्यात उडी मारून त्या मुलाला बाहेर काढले. विराट विजय चव्हाण असे त्या मृत मूलाचे नाव आहे.
गेल्या काही दिवसापूर्वी शाळा क्रमांक 10 च्या बाजूला व डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या समोरील भागात असणाऱ्या जागेत नगरपालिकेने सुधारणा करण्याच्या हेतूने त्या परिसरातील जुनी भिंत व अन्य बांधकाम हटवले होते व त्या ठिकाणी सध्या संरक्षक भिंतीसाठीचे काम सुरू होते, मात्र संबंधित ठेकेदाराने या ठिकाणी काम करताना कोणतीही काळजी घेतली नसल्याचे दिसून आले. या ठिकाणी जेसीबीने मोठ मोठे खड्डे काढले असून त्यात प्रमाणात पाणी साचले आहे. सायंकाळी या परिसरात लहान मुले खेळत होती. त्यांच्यातील एक मुलगा गायब झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर कुटुंबियांनी शोधाशोध केली. त्या वेळेला काही लोकांनी सांगितले की, या परिसरात पाणी साठले खड्या शेजारी मुले खेळत होती.
दरम्यान आता या परिसरात प्रचंड लोकांची गर्दी झाली असून तणावाचे वातावरण आहे. पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील घटनास्थळी दाखल झाले असून संतप्त जमाव शहर पोलीस स्टेशनकडे धावला आहे. संबंधित ठिकाणी कुटुंबीयांचा आक्रोश सुरू आहे.