स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई : 26 लाखांचा मुद्देमाल जप्त
सातारा : खटाव तालुक्यात खटाव गावच्या हद्दीत भराडे वस्तीजवळील येरळा नदीच्या पात्रात अवैध वाळू उत्खनन करणाऱ्या पाच वाळू तस्करांवर पुसेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून यापैकी चौघांना अटक करण्यात आली आहे. एकजण फरार झाला असून या संशयितांकडून एक जेसीबी, व वाळूने भरलेल्या दोन ट्रॅक्टर ट्रॉली असा एकूण 26 लाख 14 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात सातारा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी करण राजेंद्र पाचागणे, कैलास अंकुश गलांडे, ओंकार धनाजी पाटोळे, निलेश बाळू मदने सर्व (रा. खटाव, ता. खटाव) यांना ताब्यात घेतले असून गणेश उर्फ रजनीकांत शंकर शिंदे (रा. खटाव) हा फरारी झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, दि. 24 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांना त्यांच्या बातमीदारांकडून खटाव तालुक्यात वाळू तस्करी सुरु असल्याची माहिती मिळाली. त्यांनी पोलीस उपनिरीक्ष गणेश वाघ यांच्या नेतृत्वाखाली पथक तयार करुन अवैध वाळू तस्करी करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले.
दि. 25 रोजीच्या पहाटे पावणे तीनच्या सुमारास खटाव गावच्या हद्दीत भराडे वस्ती येथे येरळा नदीचे पात्रात अचानक पोलीस पथकाने छापा टाकला. त्यावेळी नदी पात्रात काही इसम जेसीबी, ट्रॅक्टर च्या साहयाने वाळू उपसा करून नदीपात्राजवळ वाळूचा डेपो करत होते. सदर ठिकाणी अंदाजे चार ब्रास वाळू चा डेपो तयार केला असलेचे निदर्शनास आले. या वाळू डेपोवरती महसुल विभागामार्फत कारवाई करण्याची तजवीज करुन चौघांना जेसीबी व वाळूने भरलेली ट्रॅक्टर ट्रॉलीसह ताब्यात घेतले. त्यांच्यावर सदर बाबत पुसेगांव पोलीस ठाण्यास गुरनं. 218/2021 भादंवि कलम 379 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. त्यांच्या ताब्यातील एक जेसीबी, व वाळूने भरलेले दोन ट्रॅक्टर ट्रॉली असा एकूण 26 लाखा 14 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस अधिक्षक अजयकुमार बंसल, अपर पोलीस अधिक्षक अजित बोऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या आदेशानुसार पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघ, सहाय्यक फौजदार तानाजी माने, हवालदार, संतोष पवार, लक्ष्मण जगधने, साबीर मुल्ला, नितीन गोगावले, मंगेश महाडीक, पोलीस नार्इक अमोल माने, अमित सपकाळ, अर्जून शिरतोडे, स्वप्नील माने, शिवाजी भिसे, गणेश कापरे, कॉन्स्टेबल स्वप्नील दौंड, प्रविण पवार, मोहसिन मोमीन, मयुर देशमुख व पुसेगांव पोलीस ठाण्याचे हवालदार पाटील व चालक पो. कॉ. डोंबे यांनी सदर कारवाईमध्ये सहभाग घेतला. या पथकाच्या कामगिरीबाबत पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल, अपर पोलीस अधीक्षक, अजित बोऱ्हाडे यांनी विशेष अभिनंदन केले आहे.