मोक्क्यातील संशयितांसोबत डीवायएसपी, पोनि, सपोनिचे फोटो सेशन; बरडेसाहेब ”सद्रक्षणाय खलनिग्रहणाय” ब्रिदवाक्याची जाण ठेवत थोडीतरी लाज बाळगा
सातारा : मोका, सावकारी, दरोडा यासारखे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या संशयित आरोपीच्या वाढदिनी गंभीर गुन्ह्यातील संशयिताने फलटण उपविभागीय कार्यालय, पोलीस ठाण्यात जाऊन विविध वस्तूंचे वाटप केले. हे सर्व सेलिब्रेशन डीवायएसपी, पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांसोबत झाल्याने फलटणच्या रामराज्यात पोलिसांचे ‘रावणराज’ चालले असल्याची चर्चा फलटणवासियांमध्ये सुरु आहे.
दरम्यान, अमिश पवार याच्याविरुद्ध सावकारीसह इतर गुन्हे दाखल आहेत. त्याच्या वाढदिवसानिमित्त मोका सारख्या गंभीर गुन्हे दाखल असलेल्या संजय जाधव याने विविध उपक्रम केले. मात्र यातील दोन उपक्रमांमुळे फलटण पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. संजय जाधव याने फलटण उपविभागीय कार्यालयात जाऊन डीवायएसपी तानाजी बरडे यांना मास्क व सॅनिटायझर भेट दिले. त्याचबरोबर फलटण पोलीस ठाण्यात जाऊन पोलीस निरीक्षक भरत किंद्रे आणि सहा.पो.निरीक्षक सचिन राऊळ तसेच इतर कर्मचाऱ्यांना भेटून साहित्याचे वाटप केले. मोक्क्यातील संशयित आरोपींसोबतच फलटणचे पोलीस अधिकारी झळकाल्यानंतर संतापाची लाट निर्माण झाली आहे. रेकॉर्डवरील आरोपींसोबत पोलीस अधिकारी झळकत असल्याने तपासच संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे. न्यायाची अपेक्षा करायची कोणाकडून ? असा प्रश्न फलटणकरांना पडला आहे.
”सद्रक्षणाय खलनिग्रहणाय” हे महाराष्ट्र पोलीसांचे ब्रीदवाक्य आहे. याचा अर्थ असा की, महाराष्ट्र पोलीस सज्जनांचे रक्षण करण्यास आणि दुर्जनांवर नियंत्रण ठेवून त्यांचा नायनाट करण्यास कटीबध्द आहेत. किमान या ब्रिदवाक्याची लाज तरी डीवायएसपी तानाजी बरडेंनी बाळगायला हवी होती. मात्र आतापर्यंतच्या फलटणमधील कार्यकाळात गुन्हेगारांना पाठीशी घालत सर्वसामान्यांवर खोटे गुन्हे दाखल करण्याचे पाप डीवायएसपी तानाजी बरडे आणि त्यांच्या अधिकाऱ्यांनी केले आहे. या पापाचा पुरावा म्हणजे हे फोटोसेशन, असं म्हटल्यास नवल वाटलंय नको.
फलटण तालुक्यात चाललेल्या गैरकारभाराचे वाभाडे माध्यमांनी अनेकदा काढल्यानंतर ही अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे धाडस वरिष्ठांनी न दाखवल्यामुळे आज हा दिवस पाहण्याची वेळ जनतेवर आली आहे. मात्र, अशा अधिकाऱ्यांवर आतातरी कारवाई करत सर्वसामान्यांना न्याय देण्याचे काम वरिष्ठ अधिकारी करणार का ? कि पूर्वीप्रमाणे बरडेंना पाठीशी घालत गैरकारभाला हातभार लावणार, हे पाहावे लागणार आहे.
गृहराज्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात हा प्रकार निंदनीय : महारुद्र तिकुंडे
गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्याच जिल्ह्यात पोलिस गुन्हेगारांसोबत अशा प्रकारे फोटोसेशन करत असलेला प्रकार हा अतिशय निंदनीय असून यामध्ये जबाबदार अधिकाऱ्यांचा समावेश असणे संतापजनक आहे. यातून गुन्हेगारांना पाठीशी घालत त्यांना गैरकृत्य करण्यास पोलिसच पाठबळ देत असल्याचे स्पष्ट होते. अशा अधिकाऱ्यांशी चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्याची भूमिका वरिष्ठांनी घ्यावी, अन्यथा साताऱ्याचा बिहार व्हायला वेळ लागणार नाही, अशी भूमिका सामाजिक कार्यकर्ते महारुद्र तिकुंडे यांनी व्यक्त केली.
#DYSP TANAJI BARADE
पोलिसांच्या या फोटोसेशनमुळे सामान्य भयभीत : धनंजय महामूलकर
फलटण पोलिसांच्या गैरकारभाराबाबत आम्ही वेळोवेळी आवाज उठविला आहे. गुन्हेगारांना पाठीशी घालत सामान्यांना त्रास देण्याची फलटण पोलिसांची जुनी पद्धत आहे. पोलीस अधिकारीच जर गुन्हेगारांसोबत फोटोसेशन करत असतील सामान्यांनी न्याय कोणाकडे मागायचा, डीवायएसपी बरडे आणि पोलीस निरीक्षक किंद्रे हे जबाबदार अधिकारी आहेत. त्यांच्या अशाप्रकारे कृत्यामुळे सामान्यांच्या मनात भीतीचे वातावरण तयार झाले आहे. याप्रकाराची चौकशी व्हावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष धनंजय महामूलकर यांनी केली.