सातारा स्थानिक गुन्हे शाखा व कराड पोलीस ठाण्याची कारवाई
कराड : कराड तालुक्यातील कार्वे ते कोरेगाव रोडवर काल 30 वर्षिय महिलेच्या डोक्यात दगड घालून खून केल्याप्रकरणी सातारा स्थानिक गुन्हे शाखेने आणि कराड तालुका पोलिसांच्या मदतीने अवघ्या चार तासात संशयित आरोपीला येरवळे, ता. कराड येथून गजाआड केले, त्यास आज दि.4 जानेवारी रोजी कराड येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. शरद हनुमंत ताटे वय 30 रा. येरवळे असे संशयित नाव आहे. तर खून झालेल्या महिलेचे नाव वनिता आत्माराम साळुंखे वय ३० वर्षे रा. महिंद ता. पाटण जि. सातारा असे असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी कार्वे, ता. कराड गावच्या हद्दीत कोरेगावकडे जाणाऱ्या रोडवर भैरवनाथ मंदिरानजीक असणाऱ्या उसाच्या शेतात 30 वर्षीय महिलेचा डोक्यात दगड घालून खून झाल्याची घटना उघडकीस आली होती. त्यानंतर पोलीस घटनास्थळी जाऊन सखोल तपास करीत असताना काही पूरावे मिळाले होते. त्यानंतर या खुनाचा तपास वेगाने सुरू केल्याने तपासाअंती पोलिसांना काही महत्वाची माहिती हाती लागल्यानंतर तपासाची चक्रे अधिक वेगाने फिरली व अवघ्या चार तासात संशयित आरोपी शरद हनुमंत ताटे, वय 30, रा. येरवळे यास ताब्यात घेण्यात आले. संबंधित मृत महिला वनिता आत्माराम साळुंखे रा. महिंद ता. पाटण येथिल रहिवासी आहे.
हा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याची दखल घेत पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल आणि अपर पोलीस अधीक्षक अजित बोऱ्हाडे यांनी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सातारा किशोर धुमाळ यांना गुन्ह्याचा खुलासा करण्याची सूचना केली होती.
पो.नि किशोर धुमाळ यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघ यांचे पथक तयार करून कराड तालुका पोलीस ठाण्यात रवाना करुन कराड तालुका पोलीस ठाण्यातील अधिकारी व अधिकाऱ्यांसह घटनास्थळाला भेट दिली. परिस्थितीची माहिती घेतली असता, पो.नि. किशोर धुमाळ यांनी दिलेल्या सूचनेनुसार मयताच्या अंगावर एक चिठ्ठी आढळून आली, त्या चिठ्ठीमध्ये “एका इसमाचे नांव नमुद होते व त्याने मला लग्न करतो म्हणुन आणले, माझ्याशी संबंध ठेवले व माझ्या बरोबर लग्न करत नसून मला मारहाण करुन माझ्याशी संबंध ठेवले आहेत, मी जीव दिला किंवा मला काय झाले तर त्यास तो जबाबदार आहे वगैरे मजकूर लिहला होता”. तसेच चिठ्ठीमध्ये लिहलेल्या इसमाच्या आधारकार्डची झेरॉक्स होती. त्या अनुषंगाने माहिती घेवून पथकाने तपास केला व चिठ्ठीमध्ये नांव नमुद असलेल्या इसमाच्या मेव्हण्याकडे कौशल्याने तपास केला असता त्याने सदरचा खून केला असल्याचे निष्पन्न झाले असून त्याच्या बहिनीस चिठ्ठीमध्ये नांव नमुद असलेला इसम हा मारहाण करुन त्रास देत असल्याने त्यास खूनाच्या गुन्ह्यात अडकवण्याकरिता आरोपीने मयत वनिता आत्माराम साळुंखे, वय ३० वर्षे, रा. महिंद ता. पाटण जि. सातारा या महिलेचा खून केला असल्याचे प्राथमिक तपासामध्ये निष्पन्न झाले आहे. हा खून शरद हनुमंत ताटे (वय 30) रा.येरवळे या इसमाने केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.
पोलीस अधीक्षक सातारा अजयकुमार बन्सल, उपविभागीय पोलिस अधिकारी डाॅ.रणजित पाटील यांच्या सूचनेनुसार सातारा अप्पर पोलिस अधीक्षक अजित बोऱ्हाडे, पोलिस निरीक्षक किशोर धुमाळ, स्थानिक गुन्हे शाखा, सातारा व पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, पोलिस उपनिरीक्षक गणेश वाघ, पो.शरद बेबले, साबीर मुल्ला, लक्ष्मण जगधने, प्रवीण फडतरे, रोहित निकम, विशाल पवार, मयूर देशमुख, मोहसीन मोमीन व कराड तालुका पोलीस ठाण्याचे ए.पोलिस उपनिरीक्षक भरत कांबळे, पो.धनंजय कोळी, सज्जन जगताप, उत्तम कोळी यांनी ही कारवाई केली असून या कारवाईत सहभागी अधिकारी व अधिकाऱ्यांचे पोलीस अधीक्षक, सातारा व अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी अभिनंदन केले आहे.




















