पाटण : पाटण नगरपंचायतीच्या चार प्रभागांसाठी दाखल झालेल्या ४२ उमेदवारी अर्जांची छाननी मंगळवारी शांततेत पार पडली. यामध्ये सहा अर्ज अवैध आणि ३६ अर्ज वैध ठरले आहेत. यानंतर दहा जानेवारी दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारांना आपली माघार घेता येणार आहे. १८ रोजी मतदान व १९ रोजी मतमोजणी होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी सुनील गाढे व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा नगरपंचायत मुख्याधिकारी अभिषेक परदेशी यांनी दिली.
पाटण नगरपंचायतीच्या चार प्रभागांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. यासाठी मंगळवारी झालेल्या छाननीमध्ये प्रभाग तीनमधून भाजपाचे विद्यमान नगरसेवक सागर माने व राजेंद्र माने यांचे उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. पक्षाचा अधिकृत ए बी फाॅर्म सागर माने यांना मिळाल्याने राजेंद्र माने यांचा अर्ज अवैध ठरला. प्रभाग दहामध्ये शिवसेना तथा राज्याचे गृह राज्यमंत्री ना. शंभूराज देसाई गटाकडून अभिजीत यादव व अनमोल पाटील यांच्यापैकी अभिजीत यादव यांना ए बी फाॅर्म मिळाल्याने अनमोल पाटील यांचा अर्ज अवैध ठरला. प्रभाग तेरामध्ये सेनेच्या ना. देसाई गटाकडून सौ. वनिता पवार व सौ. हकिम यांच्यापैकी सौ. सुलताना हकिम यांना ए बी फाॅर्म मिळाल्याने सौ.वनिता पवार यांचा अर्ज अवैध ठरला. याच प्रभागातून राष्ट्रीय काँग्रेस व अपक्ष असे दोन अर्ज दाखल केलेल्या सौ. श्रद्धा कवर यांचा काॅंग्रेस पक्षाचा अधिकृत अर्ज वैध ठरल्याने त्यांचा अपक्ष अर्ज अवैध ठरला. प्रभाग दहामध्ये सुधिर पाटणकर व किशोर गायकवाड यांनी प्रत्येकी दोन अर्ज दाखल केले होते, त्यापैकी दोघांचे प्रत्येकी एक अर्ज वैध ठरवून दुबार अर्ज अवैध ठरले.
या चार प्रभागांसाठी उमेदवारी अर्ज माघारीची मुदत दि. 10 जानेवारी दुपारी तीन वाजेपर्यंत असून त्यानंतरच प्रत्यक्ष निवडणूक दुरंगी, तिरंगी, चौरंगी की बहुरंगी याचे चित्र स्पष्ट होणार आहे. यासाठी दी. १८ जानेवारीला मतदान व १९ जानेवारीला पहिल्या टप्प्यातील तेरा व या दुसऱ्या टप्प्यातील चार अशा एकूण सतरा प्रभागांची मतमोजणी होणार आहे. पहिल्या टप्प्यातील तेरा पैकी एकाही प्रभागात बिनविरोध निवडणूक झाली नाही तीच स्थिती या चारही प्रभागात पहायला मिळत आहे.