पाटण : राज्याचे माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर व राष्ट्रवादीचे नेते सत्यजितसिंह पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली पाटण तालुका दूध उत्पादक संघाच्या पदाधिकारी निवडी बिनविरोध पार पडल्या. नूतन चेअरमनपदी सुभाषराव पवार व व्हाइस चेअरमनपदी शांताराम सूर्यवंशी यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.
पाटण तालुका दूध संघाच्या निवडणुकीत संचालक म्हणून मावळते चेअरमन शंकरराव जाधव, व्हा. चेअरमन शांताराम सूर्यवंशी, सुभाषराव पवार, आबासो सूर्यवंशी, सुरेशराव पाटणकर, अविनाश घाडगे, सखाराम लुगडे, मनोहर संकपाळ, अशोकराव मोरे, विजय शिंदे, महिला प्रतिनिधी शोभा कदम, अक्काताई काळे, इतर मागासवर्गीय मधून सुंदर गुरव (पुजारी), अनुसूचित जातीमधून विकास शिलवंत, भटक्या विमुक्त जातींमधून भागोजी लांबोर यांच्या बिनविरोध निवडी पार पडल्या . शुक्रवारी पदाधिकारी निवडीही बिनविरोध पार पडल्या व यात चेअरमनपदी सुभाषराव पवार यांची व व्हाईस चेअरमनपदी शांताराम सूर्यवंशी यांची निवड करण्यात आली.
या निवडीनंतर बोलताना विक्रमसिंह पाटणकर म्हणाले, पाटण तालुका दूध संघाने सर्वत्र आपला नावलौकिक वाढवला आहे. सर्वसामान्य शेतकऱ्यांची अर्थवाहिनी असणाऱ्या या दूध संघाची सार्वत्रिक प्रगती तालुक्याची सर्वांगीण विकासाचे प्रमुख लक्षण ठरेल, असा कारभार नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी करावा.
सत्यजितसिंह पाटणकर म्हणाले, पाटण तालुका दुध संघाची आजवरची वाटचाल यशस्वी व आदर्श आहे. तालुक्यातील सर्वसामान्य शेतकरी, दूध उत्पादक, कामगार यांचे हित जोपासणारी ही संस्था यापुढच्या काळात याहीपेक्षा अधिक जोमाने प्रगतिशील व्हावी. नूतन पदाधिकाऱ्यांनी यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत, असेही यावेळी सत्यजितसिंह पाटणकरांनी सांगितले .
नूतन पदाधिकाऱ्यांचे माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर, सत्यजितसिंह पाटणकर, पंचायत समिती सभापती राजाभाऊ शेलार, उपसभापती प्रतापराव देसाई, माजी जि.प. शिक्षण व अर्थ समिती सभापती राजेश पवार, पाटण अर्बन बँके चेअरमन बाळासाहेब राजेमहाडिक, खरेदी-विक्री संघ चेअरमन अॅड. अविनाश जानुगडे, कोयना शिक्षण संस्था अध्यक्ष डॉ. सोपानराव चव्हाण, सचिव अमरसिंह पाटणकर, शेती बाजार समिती सभापती रेखाताई पाटील, अर्बन बँक माजी चेअरमन दिनकरराव घाडगे आदी मान्यवर पदाधिकारी, कार्यकर्ते व हितचिंतकांनी अभिनंदन केले .