बारामती शहर (प्रतिनिधी):- अभिजीत ननवरे बारामती शहरातील जेष्ठ नगरसेवकांचा मुलगा, अशोक नगर मधील एक वयोवृद्ध महिला व तांबे नगर मधील रहिवासी अचानक कोरोना पॉझिटिव्ह निघाले आहेत. व कोरोनाग्रस्थ असलेल्या आयटी अभियंत्याच्या तालुक्यातील काटेवाडी येथील एक मित्रही पॉझिटिव्ह निघाला आहे. तर सावळ येथील पुणे शाखेत असणारा बँक कर्मचारी देखील पॉझिटिव्ह निघाला आहे. बारामती तालुक्यात एकूण सहा जण कोरोनाबाधित आढळले आहेत. अशी माहिती उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे आणि तालुका वैद्यकीय अधिकारी मनोज खोमणे यांनी दिली. दौंड, इंदापूर पाठोपाठ बारामतीमध्ये मोठ्या प्रमाणावर रुग्ण आढळून आल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासनापुढे एक आवाहन निर्माण झाले आहे. लॉकडाऊन नंतर अनलॉकच्या दिशेने जात असताना सोशल डिस्टंसिन्गचा उडालेला बोजवारा व

कंटेन्मेंट झोनमधील प्रवास यामुळेही बारामतीतील रुग्ण वाढू लागल्याचे दिसू लागले आहेत.तरी बारामती शहरातील नागरिकाना आवाहन करण्यात आले आहे की विनाकारण घराबाहेर कोणीही पडू नये.अत्यावश्यक काम असेलतरच बाहेर पडावे. बाहेर पडताना सॅनिटायझर, मास्क घेऊनच बाहेर पडावे व सोशल डिस्टंसिन्गचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे असेही आवाहन करण्यात आले आहे. अनेक दिवस बारामती शहरात कोरोनाचे रुग्ण आढळून न आल्याने प्रशासनाने काही नियम व अटी वरून सकाळी ९ ते सायंकाळी ५ पर्यंत शहरातील बाजारपेठ सुरु करण्यास परवानगी देण्यात आली होती. व्यापाऱ्यांनी वेळ वाढवून मागितल्याने पुन्हा सायंकाळी ७ पर्यंत दुकाने सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात अली मात्र एकदम पाच कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्याने तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने प्रशासनाने बाजारपेठ सुरु ठेवण्याच्या संदर्भात वेळेत बदल केला आहे. त्यानुसार सकाळी ९ ते सायंकाळी ५ पर्यंत दुकाने सुरु राहणार आहेत.





















