कराड : येथिल पांढरीची वाडी येथील धरे शिवारात शेतकरी शंकर तुकाराम ढेरे यांच्या शेतात आज दुपारी ऊस तोडणी सुरू असताना ऊस शेतात बिबट्याची तीन बछडे आढळून आली. कराड तालुक्यात पुन्हा बिबट्याच्या पिलाचे दर्शन झाल्याने खळबळ उडाली आहे. बिबट्याचा वावर,मानवी वस्तीत शिरकावा, प्राणी व माणसांवर होत असलेले हल्ले यामुळे किरपे, येणके नंतर आता तारूख व कूसूरू भागात शेतकरी,गावकरी चांगलेच धास्तावले आहेत.
तारुख येथे आज उसाच्या शेतात बिबट्याची दीड महिन्यापूर्वी जन्मलेली तीन बछडे सापडल्याने बिबट्याचा वावर या भागात कायमचा असल्याचे स्पष्ट होत आहे. काल दूपारी बछडे दृष्टीस पडताच शेतकऱ्यांनी पोलीस पाटील सतीश भिसे यांना याबाबतची माहिती दिली. भिसे यांनी घटनेचे गांर्भिय ओळखून वनाधिकारी व मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांना माहिती दिली.
वनविभागाने तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन बछडे ताब्यात घेतली. मादी बिबट्या ही जवळपासच होती व ती चिडून आक्रमक होऊ नये म्हणून वरिष्ठांनी दिलेल्या सूचनेनुसार या तीन बछाड्याची आई सोबत भेट घडवून आणण्यांचे योजना आखण्यात आली. त्यानूसार सायंकाळी 6.30 वाजता सदर शिवारात पुन्हा तीन बछडे एका कॅरेटमध्ये घालून त्याच्या आजू बाजूस कॅमेरे लावून ठेवण्यात आले. कॅमेरा लावत असतानाच बिबट्याची मादी निदर्शनास आली, ती त्याच परिसरात घुटमळत होती. त्यामुळे बछडे कॅरेटमध्ये ठेवून कर्मचारी व अधिकारी जागेवरून निघून गेले.
यासाठी वनक्षेत्रपाल तुषार नवले, मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे, हेमंत केंजळे, वनपाल बाबुराव कदम, सावखंडे, वनरक्षक रमेश जाधवर, भारत खटावकर, राठोड, व इतर वनकर्मचारी उपस्थित होते.